MPSC Drug Inspector Paper Leak Pudhari
महाराष्ट्र

MPSC Paper Leak: ‘लव्ह कनेक्शन’मधून MPSCचा पेपर फुटला? एका उमेदवारामुळे रद्द झाली परीक्षा; तपासात धक्कादायक ट्विस्ट

MPSC Drug Inspector Paper Leak: आता शेकडो उमेदवारांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार असून, एमपीएससीच्या परीक्षा सुरक्षेवर आणि पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Rahul Shelke

MPSC Drug Inspector Paper Leak: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) औषध निरीक्षक, गट-ब भरती परीक्षेतील गैरप्रकाराने आता अधिकच गंभीर वळण घेतलं आहे. प्राथमिक तपासात एका उमेदवाराला परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका मिळाल्याची माहिती समोर आल्यानंतर आयोगाने संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या प्रकरणातील सर्वाधिक धक्कादायक भाग म्हणजे प्रश्नपत्रिका फुटण्यामागे प्रेमसंबंध असू शकतो, अशी माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

एका व्यक्तीने एमपीएससीतील कनिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्याच्या संपर्कातून प्रश्नपत्रिका मिळवली आणि ती पुढे संबंधित उमेदवारापर्यंत पोहोचल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. नेमकं कोण कोणाच्या संपर्कात होतं, प्रश्नसंच कसा बाहेर आला आणि तो किती जणांपर्यंत पोहोचला, याचा तपास अद्याप सुरू आहे.

22 मार्च रोजी झाली होती परिक्षा

अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठी एमपीएससीने 22 मार्च 2026 रोजी राज्यातील सहा विभागीय मुख्यालयांमध्ये ऑफलाइन परीक्षा घेतली होती. त्यानंतर 12 जून रोजी निकाल जाहीर झाला आणि 506 उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले.

पुढील टप्प्यात 1 जुलै ते 22 जुलैदरम्यान 488 उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मुलाखतींची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र आणि अपात्र उमेदवारांची तात्पुरती गुणवत्ता यादीही जाहीर झाली होती. अनेक उमेदवार आता अंतिम निकालाच्या प्रतीक्षेत असतानाच परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबाबत गंभीर आरोप समोर आले आणि संपूर्ण प्रक्रियेचे गणितच बदलले.

प्राथमिक तपासात एका उमेदवाराला लाभ झाल्याचा संशय

या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेकडून करण्यात आली. प्राथमिक तपासात एका उमेदवाराला परीक्षेपूर्वी प्रश्नसंच मिळाला आणि त्याचा परीक्षेत फायदा झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्याची माहिती समोर आली आहे.

जर गैरप्रकाराचा थेट फायदा एका उमेदवारालाच झाला असेल, तर प्रामाणिकपणे परीक्षा देणाऱ्या इतर शेकडो उमेदवारांची संपूर्ण प्रक्रिया रद्द करण्याची वेळ का आली? असा प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत.

एमपीएससीच्या दृष्टीने याचे उत्तर परीक्षेच्या गोपनीयतेत दडलेले आहे. प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वी एखाद्या अनधिकृत व्यक्तीपर्यंत पोहोचली असेल, तर केवळ किती उमेदवारांना फायदा झाला हा एकमेव मुद्दा राहत नाही. प्रश्नपत्रिकेची सुरक्षा भंग झाली, ही बाबच संपूर्ण परीक्षेच्या निष्पक्षतेवर प्रश्न उपस्थित करण्यासाठी पुरेशी ठरते.

म्हणूनच आयोगाने संपूर्ण भरती प्रक्रियेची विश्वासार्हता कायम ठेवण्यासाठी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे.

प्रेमसंबंधांचा संशय

तपासातील सूत्रांकडून समोर आलेल्या माहितीनुसार, या कथित प्रश्नपत्रिका गैरप्रकारामागे प्रेमसंबंध असण्याचा संशय आहे. एका प्रियकराने एमपीएससीमधील कनिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्याशी संपर्क साधून प्रश्नपत्रिका मिळवल्याची शक्यता तपासली जात आहे.

त्यानंतर हा प्रश्नसंच पुढे संबंधित उमेदवारापर्यंत पोहोचल्याचा संशय आहे. मात्र, या साखळीबाबत पोलिसांनी अद्याप सविस्तर अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही.

त्यामुळे ‘प्रेमसंबंधातून पेपरफुटी’ असा निष्कर्ष तपास पूर्ण होण्यापूर्वी काढणे योग्य ठरणार नाही. अंतिम सत्य तपासानंतरच स्पष्ट होईल.

20 मार्चलाच प्रश्न मिळाल्याचा रोहित पवारांचा दावा

या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी गंभीर आरोप केले होते. 22 मार्च रोजी परीक्षा होण्यापूर्वीच एका विद्यार्थ्याला प्रश्न उपलब्ध झाल्याचा दावा त्यांनी केला होता.

त्यांच्या म्हणण्यानुसार, नंदुरबारमधील एका खासगी अकादमीशी संबंधित विद्यार्थ्याला परीक्षेतील जवळपास 90 टक्के प्रश्न आधीच मिळाले होते. हे प्रश्न 20 मार्चलाच मिळाल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

प्रश्न पैसे मिळाल्यानंतर व्हॉट्सअॅपवर पाठवले जात होते आणि काही वेळाने मेसेज ‘डिलीट फॉर ऑल’ केले जात असल्याचाही दावा करण्यात आला होता. या व्यवहाराशी संबंधित पुरावे आपल्याकडे असल्याचे पवार यांनी सांगितले होते.

त्या वेळी पेपरफुटीचे आरोप नाकारले जात होते. मात्र, आता प्राथमिक तपासात एका उमेदवाराला परीक्षेपूर्वी प्रश्नसंच मिळाल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाल्यानंतर आणि त्यानंतर भरती प्रक्रिया रद्द करण्यात आल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची दिशा बदलली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT