मराठवाडा

हिंगोली : शिवसैनिकांना धमकी दिल्यास गाठ निष्ठावंत शिवसेनेशी : संदेश देशमुख

दिनेश चोरगे

सेनगाव : राज्यातील शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यात शिवसेनेचे दोन गट निर्माण झाली आहेत. बंड केलेल्या गटाकडून जिल्ह्यातील निष्ठावंत शिवसैनिकांना सोशल मीडियाद्वारे धमकी दिल्या जात असल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जात आहे. यामुळे यापुढे शिवसैनिकांना कुठलीही धमकी दिल्यास गाठ आमच्याशी आहे, असा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी दिला आहे.

राज्यात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्याने शिवसेना दोन गटात विभागली गेली आहे. अनेक जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या झडत असल्याचे पहावयास मिळत आहे. तर गाव पातळीवरून जिल्हा पातळीवर कार्यरत असलेली शिवसेना यामध्येही दोन गटाचे विभाजन झाले आहे.

शिंदे गट व ठाकरे गट यांच्या कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांबाबत आरोप व अपमानास्पद प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून होत आहे.
तर काही कार्यकर्त्यांकडून शिवसेनेतील कार्यकर्त्यांना सोशल मीडियाद्वारे धमकी दिल्या जात असल्याचा आरोप शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी केला आहे. याबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत जिल्ह्यातील कुठल्याही माझ्या शिवसैनिकास  धमकी दिल्यास आम्ही त्यास जशास तसे उत्तर देण्यास सक्षम आहोत व अशा धमकी सत्राला आमची शिवसेना कदापी घाबरणार नाही आणि खचणार सुद्धा नाही असा इशारा उपजिल्हाप्रमुख देशमुख यांनी दिला आहे.

राज्यात राजकीय सत्ता नाट्य प्रचंड घडत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा राजकीय संघर्ष हा न्यायालयीन प्रलंबित असल्याने नेमके न्यायालयाकडून कुठल्या पक्षाकडे निकाल लागतो? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे, तर गाव पातळीपासून ते जिल्हा पातळीपर्यंत  सर्वसामान्य शिवसैनिक एकमेकांच्या गटबाजीचे सोशल मीडियाद्वारे आम्ही कसे प्रबळ आहोत व निष्ठावंत आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. या सोशल मीडियाच्या एकमेकांच्या प्रतिक्रियातून एकमेकांना धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी केला आहे.

अशा धमकीना आम्ही गांभीर्याने घेत नाही कारण आम्ही खरे बाळासाहेबाचे शिवसैनिक आहोत त्यामुळे जिल्ह्यातील कुठल्याही शिवसैनिकाला धमकी देणे तात्काळ थांबवा अन्यथा गाठ आमच्याशी आहे, असा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी दिला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT