मराठवाडा

हिंगोली : शिंदे यांच्या बंडानंतरही हिंगोलीत शिवसेना अभेद्य

मोनिका क्षीरसागर

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा ः शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याने पक्षात उभी फूट पडली असताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार संतोष बांगर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहणार असल्याचे सांगत थेट वर्षा बंगल्यावर हजेरी लावल्याने शिवसेनेतील बंडाचा फटका हिंगोलीत शिवसेनेला बसला नसून, पक्ष अभेद्य असल्याचे चित्र आहे. हिंगोलीतील शिवसेनेच्या फुटीचा इतिहास पाहता पक्षाला कायम सोडचिठ्ठी देणार्‍यांची संख्या मोठी आहे.

दिवंगत खासदार विलास गुंडेवार, माजी खासदार शिवाजी माने, माजी खासदार सुभाष वानखेडे, माजी आमदार गजानन घुगे यांची नावे अग्रक्रमाने येतात. मधल्या काळात शिवसेनेची एकहाती सत्ता जिल्ह्यात राहिली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिकांमध्ये शिवसेनेचे वर्चस्व राहिले असताना अनेक घडामोडी घडून अनेकांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्याचा इतिहास आहे. नारायण राणे यांच्या बंडानंतर माजी खासदार शिवाजी माने यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

राज ठाकरे यांच्या बंडानंतर विद्यार्थी आघाडीचे अनेक कार्यकर्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये दाखल झाले होते. शिवसेनेतील सर्वांत मोठे बंड म्हणून एकनाथ शिंदे यांच्या बंडाकडे पाहिले जाते. 35 पेक्षा अधिक शिवसेनेचे आमदार शिंदे यांच्या गटात दाखल झाल्याने राज्यस्तरावर शिवसेनेची मोठी हानी झाली आहे. हिंगोलीत शिवसेनेचे एकमेव आमदार असलेले संतोष बांगर यांच्याकडे जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारीही आहे. आ. बांगर हे मागील दोन वर्षांच्या कार्यकाळात एकनाथ शिंदे यांच्याशी सलगी राखून होते.

शिंदे यांच्या बंडानंतर आमदार बांगर यांची नेमकी भूमिका काय, याबाबत मंगळवारी दुपारपर्यंत शिवसैनिकांमध्ये संभ्रम होता, परंतु आमदार संतोष बांगर यांनी स्वतः आपली भूमिका स्पष्ट करून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार असल्याचे जाहीर केल्याने शिवसेनेतील संभ्रम दूर झाला आहे. हिंगोलीतील शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून आ. बांगर यांच्याकडे पाहिले जाते. स्वतः बांगर यांच्यावर शिवसेना वाढीची जबाबदारी असल्याने त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वसामान्य शिवसैनिकांनी स्वागत केले असून, आगामी काळात शिवसेना संघटन वाढीची मोठी जबाबदारी आ. बांगर यांच्यावर येऊन पडली आहे.

 भाजप पदाधिकार्‍यांचे हौसले बुलंद !

शिवसेनेतील बंड पाहता महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाल्याने पुन्हा एकदा फडणवीस यांचे सरकार येणार असल्याचे चित्र माध्यमातून रंगविण्यात येत आहे. त्यामुळे हिंगोलीतील भाजपचे नेते व पदाधिकार्‍यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, पुन्हा फडणवीस सरकार सत्तेवर आल्यास हिंगोलीतील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना सुगीचे दिवस येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. हिंगोलीत भाजपचे तानाजी मुटकुळे हे एकमेव आमदार आहेत.

SCROLL FOR NEXT