दौलताबाद, पुढारी वृत्तसेवा : फतियाबाद (ता. गंगापूर) येथून जाणाऱ्या समृद्धीफ महामार्गावरील पुलावरून रसायनाचे बॅरल घेऊन जाणारा ट्रक कठडे तोडून खाली कोसळला. खाली कोसळल्यानंतर ट्रक पेटल्याने चालक व कलिनचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. तीन ) रात्री अकराच्या सुमारास घडली. चालक सोहेल खान इस्माईल खान (३२) व क्लिनर नौशाद ऊर्फ लाला (भिलाई, जि.दुर्ग, छत्तीसगड) असे मृतांचे नाव आहे.
मुंबई येथून नागपूरच्या दिशेने रसायनाचे बॅरल व कंपनीचे इतर साहित्य घेऊन जाणारा मालवाहू ट्रक वेरूळ इंटरचेंजच्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या गोकुळवाडी येथील समृद्धीच्या पुलाजवळ आला. चालकाला रात्री अंदाज न आल्याने सुरक्षा भिंत तोडून ट्रक पुलाच्या मधोमध असलेल्या पोकळीमधून खाली कोसळला व पेट घेतला. यात होरपळून चालक व क्लिनरचा मृत्यू झाला. समृद्धी महामार्गाच्या पाच ते सहा अग्निशामक वाहनांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आली नाही. छत्रपती संभाजीनगर येथून महापालिकेच्या अग्निशामक वाहनांना पाचारण करण्यात आल्यानंतर ही आग आटोक्यात आली. पोलिस व ग्रामस्थांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची दौलताबाद पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.