ShivSena BJP  
मराठवाडा

शिवसेनेकडून बुलडाणा हस्तगत करण्याचा प्रयत्न

मोहन कारंडे

बुलडाणा : विजय देशमुख
सन 2024 मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने मिशन-45 चा निर्धार करून राज्यातील लोकसभेच्या 48 पैकी 45 जागा जिंकण्याचा संकल्प केला आहे. या अनुषंगाने राज्यातील 16 लोकसभा मतदारसंघांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे त्यात बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचा अंतर्भाव आहे. आता शिवसेनेकडून हा मतदारसंघ हस्तगत करण्यासाठी भाजपाने चंग बांधला आहे.

संभाव्य लढतीत भाजप व शिवसेना या उभय पक्षांची बलस्थाने, न्यूनस्थाने यावर चिकित्सकपणे मंथन करणारा भाजप आपल्या उमेदवाराच्या निवडीसाठी वेळ दवडणार नाही, असे दिसत आहे. शिवसेनेचे प्रतापराव जाधव बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. ही त्यांची तिसरी टर्म आहे. 2009 मध्ये मतदारसंघांच्या पुनर्रचनेत 30 वर्षापासूनचे आरक्षण संपून बुलडाणा लोकसभा मतदारसंघ खुला झाला. त्याचवेळी मेहकर विधानसभा मतदारसंघ हा आरक्षित झाल्याने पंधरा वर्षापासून शिवसेनेचे आमदार असलेल्या जाधवांची राजकीय कोंडी झाली होती पण खुल्या झालेल्या लोकसभा मतदारसंघामुळे त्यांना खासदारकीची संधी मिळाली. अर्थात 1995 पासून म्हणजेच त्यांच्या राजकीय उदयापासूनच भाजप – शिवसेना युतीमुळे त्यांची वाटचाल सुकर झाली. 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकीत मोदी लाटेवर ते तरून गेले हे शिवसैनिकही आतून मान्य करतात.

2024 मधील लोकसभा निवडणूक राज्यात महाविकास आघाडी संयुक्तपणे लढण्याची शक्यता असून उमेदवारी ही शिवसेनेकडेच राहील असा अंदाज आहे. कारण तीन वेळा पराभव झालेली राष्ट्रवादी काँग्रेस आता लोकसभा उमेदवारीचा दावा करणार नाही. काँग्रेस पक्षाची तर चर्चाही नाही. बुलडाणा लोकसभा मतदारसंघात विधानसभेचे सहा मतदारसंघ. यात भाजपकडे तीन, शिवसेनेकडे दोन व राष्ट्रवादीकडे एक मतदारसंघ आहे. म्हणजेच निम्म्या मतदारसंघांवर भाजपचे प्राबल्य आहे. त्याखालोखाल शिवसेनेचे अस्तित्व आहे. बुलडाण्यात संभाव्य लढत भाजप- शिवसेना उमेदवारात होईल हे स्पष्टच आहे.

विद्यमान खासदार प्रतापराव जाधव मुत्सद्दी राजकारणी म्हणून ओळखले जातात. यापुढे निवडणूक रिंगणात एकेकाळचा पारंपारिक मित्र भाजप आता कडवा प्रतिस्पर्धी म्हणून समोर उभा ठाकणार आहे. व्यूहरचना करण्यात पारंगत असलेल्या पक्षाकडून आपला गड अभेद्य राखण्याबाबत खा. जाधव सजग आहेत का? त्यांची मुख्य मदार ही शिवसेनेच्या मेहकर व बुलडाणा विधानसभेच्या भरवशावर आहे. जळगाव जामोद, खामगाव आणि चिखली या तीनही विधानसभा मतदारसंघात भाजपची मजबूत तटबंदी. तिकडे सिंदखेडराजा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार तथा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचेशी संबंध ताणलेले. त्यातच सिंदखेडराजा मतदारसंघात भाजपच्या पंकजाताईंचा मोठा प्रभाव आहे. बुलडाण्यात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना लक्ष देण्यास सांगण्यात आले असून, त्यांनी अलिकडेच जुन्या जाणत्यांच्या व्यक्तीश: भेटी घेत कार्यकर्त्यांच्याही बैठका घेतल्या. भाजप दीर्घ काळानंतर स्वबळावर निवडणूक लढवणार असल्यामुळे कार्यकर्त्यातही उत्साह आहेच. सुयोग्य उमेदवार शोधणे क्रमप्राप्त असले तरीही बुलडाणा भाजपत सक्षम उमेदवारांची वाणवा नाही. प्रामुख्याने जळगाव जामोदचे भाजपचे ज्येष्ठ आ.डॉ. संजय कुटे व चिखलीच्या आ.श्वेताताई महाले ही दोन नावे लोकसभा उमेदवारीसाठी समोर दिसत असल्याचे बोलले जाते. मात्र हे दोनही आमदार अद्याप याबाबत काही उघडपणे बोललेले नाहीत.

शिवेवरील नेत्याकडे लक्ष

बुलडाण्याच्या शिवेवरील भाजपच्या ज्येष्ठ नेत्याच्या घराण्याला अनेक निवडणुका जिंकण्याचा अनुभव आहे. राजकीय वातावरण आश्वासक दिसले तर आपल्या कन्येला किंवा सुनबाईलाच निवडणुकीत उतरवायला काय हरकत आहे!
तसेही सुनबाईचे माहेर इकडचेच. माहेराच्या जिल्ह्यातून मतांची ओटी भरभरून मिळेल. अन घरात आपसूकच आणखी एका पदाची भर पडेल. जुगाड जमवणं तसं कठीण नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT