चपोली ; शिवानंद स्वामी : शहरी भागात लग्नसराईचा धुमधडाका सुरू झाला असला तरी ग्रामीण भागात मात्र अजूनही लग्न जुळत नसल्याचे दिसून येत आहे. मुलींना शेतकरी नवरा नको असल्याने वधु पित्याची अडचण वाढली आहे. नोकरी असलेले स्थळ शोधताना आई- वडिलांना मात्र चांगलीच कसरत करावी लागत असल्याचे वास्तव चित्र दिसून येत आहे.
शेतकऱ्यांच्या नशिबी पाचवीलाच संघर्ष पुंजला आहे. अवकाळी, अतिवृष्टी, महापूर किंवा दुष्काळ अशा निसर्गाच्या अवकृपेमुळे बळीराजाला आस्मानी व सुलतानी संकटाला सामोरे जावे लागत असताना ग्रामीण भागात लग्न जुळण्याचे मोठे आव्हान उभे टाकले आहे. विवाह योग्य मुली शासकीय नोकरदाराला पसंती देत असून शेतकरी मुलाला चक्क नकार देत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. कोरोना काळात अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली त्यामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आणि त्यामुळे लग्न जुळविणे खूपच अवघड झाले आहे. शेतकरी मुलांचे वय वाढत चालले आहे तरीही अजून बऱ्याच जणांचे लग्न अजूनही जुळताना दिसत नाही.
परिणामी शेतकऱ्यांच्या मुलांमध्ये नैराश्याचे वातावरण दिसत आहे. पदवीपर्यंत शिक्षण घेऊन शेती व्यवसाय करणाऱ्या तरुणांना लग्न जुळवताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे जवळच्या नात्यातील मुलींची शोधाशोध केली जात आहे. एकंदरीत शेतीवर अवलंबून असलेल्या मुलांना लग्नासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचे वास्तव चित्र समोर आले आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील मुलीच्या पित्याची नजर शहरी भागातील मुलांकडे वळली असल्याने सामान्य कुटुंबातील मुलीचे वडीलही शेतकरी मुलाला मुलगी देण्यास नकार देत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
मागील दहा वर्षापासून सातत्याने मुलींचा जन्मदर घटत असल्याने ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नाचा प्रश्न गंभीर बनत आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील मुलींचे लग्न तात्काळ जुळत आहेत, परंतु मुलांना मात्र प्रतीक्षा करावी लागत आहे.. प्रत्येक गावात किमान ५० ते ७० पर्यंत लग्नासाठी इच्छुक असलेल्या मुलांची संख्या आहे. केवळ शेतीवर अवलंबून असलेल्या विवाह इच्छुक मुलांच्या पालकांना आपल्या मुलांच्या लग्नाची चिंता भेडसावत आहे.