मराठवाडा

‘लम्पी’बाधित जनावरे क्वारंटाईन करणार मुख्यमंत्री शिंदे यांची औरंगाबादेत घोषणा : 22 जिल्ह्यांत संसर्ग

मोनिका क्षीरसागर

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा: राज्यात जनावरांमध्ये वेगाने पसरत चाललेल्या लम्पी स्किन आजारासंदर्भात टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. या रोगाचा संसर्ग रोखण्याच्या उद्देशाने जनावरांसाठी क्वारंटाईन सेंटर उभारण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी केली. या आजारामुळे दगावलेल्या जनावरांचा मोबदला शेतकर्‍यांना देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

लम्पी रोग राज्यातील जवळपास 22 जिल्ह्यांमध्ये पसरला आहे. ज्या ठिकाणी लम्पी रोगाची लागण झाली, तेथून पाच कि.मी.च्या परिघात सर्व जनावरांचे लसीकरण केले जाणार आहे. पशुसंवर्धन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 10 सदस्यीय टास्क फोर्सची स्थापन करण्यात आली आहे. लम्पी आटोक्यात आणण्यासाठी नियमित आढावा घेऊन उपाययोजना आणि शिफारस हा टास्क फोर्स करणार आहे.

औरंगाबादमधील विनोद पाटील यांनी लम्पी स्किन आजाराचा धोका ओळखून क्वारंटाईन सेंटर उभारण्याची मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याबाबतच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांना दिल्या. मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी संपूर्ण यंत्रणेला युद्धपातळीवर सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून, त्यानुसार प्रत्येक बाधित जिल्ह्यात नियोजन करण्यात आले आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

जनावर दगावल्यास मदत : जिल्हानिहाय 1 कोटी

पुणे: लम्पीमुळे जनावर मृत पावल्यास संबंधित पशुपालकास राज्य सरकार मदत देणार आहे. त्यानुसार गायीसाठी 30 हजार, बैलांसाठी 25 हजार आणि वासरांसाठी 16 हजार रुपये याप्रमाणे मदत करण्यात येणार आहे. तसेच जिल्हा परिषदेकडूनही सानुग्रह अनुदान देण्याच्या सूचना दिल्याची माहिती पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली. पशुसंवर्धन आयुक्तालयात व्हिडीओ कॉन्फरन्स आढावा बैठकीत ते बोलत होते. जनावरांमध्ये लम्पी त्वचा रोग आढळलेल्या परिसरातील पाच किलोमीटर परिघातील सर्व जनावरांचे लसीकरणाची असलेली अट शिथिल केली आहे, तर उपचारासाठी प्रत्येक जिल्ह्याला 1 कोटी रु. दिल्याचे ते म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT