मराठवाडा

 राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या कार्यालयाबाहेर पोलिस बंदोबस्त

अमृता चौगुले

सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील राजकीय घडामोडींच्या अनुषंगाने राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या शहर कार्यालय, तसेच निवासस्थानासमोर चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवाय शहरात पोलिसांची गस्त वाढवण्यात आली असल्याची माहिती शहरचे पोलिस निरीक्षक अशोक मुदीराज यांनी दिली.

शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा हाती घेतल्याने राज्यातील राजकारणात राजकीय उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत. या राजकीय भुकंपामुळे राज्यातील राजकारण चांगलेक ढवळून निघाले असून या राजकीय बंडाळीत सिल्लोड- सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार तथा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा समावेश आहे. या राजकीय बंडाळीविरोधात व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसैनिक आता रस्त्यावर उतरत आहे.

अनुचित प्रकार  घडू नये म्हणून पोलिसांनी खबरदारी घेत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे शहर कार्यालय तसेच निवासस्थानासमोर पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला असल्याची माहिती अशोक मुदीराज यांनी दिली. सिल्लोडचे शिवसैनिक निदर्शनांत सहभागी दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ बुधवारी (दि. 22) औरंगाबाद येथे शिवसेनेच्या वतीने निदर्शने करीत शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यात सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदार संघाचे शिवसेना संघटक सुदर्शन अग्रवाल, शहराध्यक्ष रघुनाथ घरमोडे, माजी पंचायत समिती सदस्य उत्तम शिंदे, सुरेश आहेर, कैलास जाधव आदी सहभागी झाले होते.

SCROLL FOR NEXT