मराठवाडा

राज्यपालांचे मराठवाड्यातील कार्यक्रम उधळून लावणार; मराठा आरक्षण गोलमेज परिषदेत निर्धार

दिनेश चोरगे

जालना; पुढारी वृत्तसेवा :  मराठा आरक्षण समितीवरून मंत्री चंद्रकांत पाटील यांची हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी करत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे कार्यक्रम उधळून लावण्याचा निर्धार रविवारी येथे आयोजित राज्यव्यापी मराठा आरक्षण गोलमेज परिषदेत करण्यात आला. तसेच मराठा आरक्षण मिळविण्यासाठी लढा सुरूच ठेवण्यासह चौदा ठराव यावेळी करण्यात आले.

मराठा समाजाला त्यांच्या हक्काचे कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळावे, याबाबत चर्चा करून आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा, मराठा आरक्षणासाठी लढणार्‍या राज्यातील विविध संघटना – अभ्यासक यांच्या मार्गदर्शनाखाली परिषद झाली. मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक डॉ. संजय लाखे-पाटील, जगन्नाथ काकडे, मराठा महासंघाचे अरविंद देशमुख, संभाजी ब्रिगेडचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष संतोष गाजरे, छावाचे संस्थापक सुभाष कोळकर, शिवबा संघटनेचे मनोज जरांगे, अ. भा. छावाचे देवकर्ण वाघ, स्वराज्य सेनेचे अप्पासाहेब कुढेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पुनर्विचार याचिकेची खुुली सुनावणी व्हावी : डॉ. लाखे

मराठवाड्यात राज्यपालांचे कार्यक्रम जेथे जेथे होतील, तेथे ते कार्यक्रम शांततापूर्व मार्गाने उधळून लावण्यात येतील, असा इशारा देत मराठा आरक्षण पुनर्विचार याचिकेची खुुली सुनावणी व्हावी, अशी मागणी कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना डॉ. संजय लाखे-पाटील यांनी केली. सरकार आपल्या राजकीय फायद्यासाठी राज्यपाल कोश्यारी यांचा उपयोग करून घेत असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला.

SCROLL FOR NEXT