सोलापूर; संदीप येरवडे : गतवर्षी सोलापूर जिल्ह्यात मराठवाड्यातील सुमारे 25 लाख मेट्रिक टन ऊस गाळपासाठी आला होता. त्यापोटी मराठवाड्यातील ऊस उत्पादकांना सुमारे 8 ते 10 कोटी रुपयांची एफआरपीची रक्कम सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी दिलेली नाही. त्यामुळे यंदा मराठवाड्यातील ऊस गाळपासाठी सोलापूर जिल्ह्यात येण्याची शक्यता कमी असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील साखर कारखान्यांची धुराडी 15 ऑक्टोबरपासून पेटणार असून यंदाचा गाळप हंगाम सुरळीत पार पडणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कारखानदारांनी जिल्ह्यातील शेतकर्यांचीही सुमारे 99 कोटींची एफआरपी अद्याप दिलेली नाही. त्यामुळे नवीन गाळप हंगाम सुरू होणार असला तरी कारखानदार थकीत एफआरपी देण्याच्या मनःस्थितीत नाहीत. विशेषतः गतवर्षी मराठवाड्यातील शेतकर्यांनी मोठ्या आशेने सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांकडे ऊस गाळपासाठी पाठविला होता. परंतु अनेक साखर कारखानदारांनी उस बिलाचा अद्याप एकही हप्ता दिलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील साखर कारखानदार मराठवाड्यात बदनाम झाले आहेत. परिणामी यंदा या कारखानदारांना आपापल्या कार्यक्षेत्रातील उसावरच गाळप हंगाम पार पाडावा लागणार आहे. लेखापरीक्षण अधिकार्यांना हाताशी धरून ऊस उत्पादकांचे पैसे दिल्याचे रेकार्ड कारखानदार दाखवीत आहेत. परंतु वास्तव तसे नसल्याचे समजते. मराठवाड्यातील शेतकरी संघटित नसल्यामुळे थकीत रक्कम मिळत नसल्याची चर्चा आहे. शिवाय ती रक्कम खूप मोठी असल्याची चर्चा आहे.
गतवर्षी जिल्ह्यातील सुमारे 30 साखर कारखान्याचे गाळप सुरू झाले होते. जिल्ह्यातील गाळपबरोबर शेजारील मराठवाडा व बीडमधूनही गाळपासाठी ऊस मोठ्या प्रमाणात आणला होता. त्यामुळे गतवर्षी जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे गाळप सर्वाधिक झाले. यंदा जिल्ह्यात नव्याने मंगळवेढा तालुक्यातील फॅबटेक, वेणूनगर येथील श्री विठ्ठल, करमाळ्यातील आदिनाथ, खामगावमधील आर्यन, अक्कलकोट तालुक्यातील स्वामी समर्थ असे पाच साखर कारखाने नव्याने गाळपास सिद्ध होत आहेत. त्यामुळे यंदा सुमारे 35 ते 36 साखर कारखाने सुरू होण्याची शक्यता आहे.