मराठवाडा

मराठवाड्यात पावसाने चिंता वाढविली

मोहन कारंडे

औरंगाबाद; अमित मोरे : राज्यात मान्सून दाखल झाला आहे, परंतु मराठवाड्यात अजूनही तुरळक स्वरूपाचीच हजेरी लागत आहे.
त्यात हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलेले अंदाजही फोल ठरल्याने चिंता वाढली असून, खरिपाची पेरणी केलेले शेतकरी अडचणीत आले आहेत. दरम्यान, मराठवाड्यात पुढील पाच दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे, परंतु सोबतच हा पाऊस पेरणीयोग्य नसेल, असेही स्पष्ट केले आहे.

मराठवाड्यात मागील तीन वर्षे जोरदार पाऊस बरसला. जूनपासूनच त्याने दमदार हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण होते, परंतु यंदा अर्धा जून उलटूनही विभागातील एकाही जिल्ह्यात मुसळधार हजेरी लागलेली नाही. हवामान तज्ज्ञांसह आयएमडीने 31 मे ते 5 जूनदरम्यान मान्सूनपूर्व जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला होता. त्यानंतर 8 जूनपासून विभागात पावसाला सुरुवात होईल, अशीदेखील शक्यता व्यक्त करण्यात आली होती, परंतु हा पाऊस काही ठिकाणी आणि तोही हलक्या स्वरूपाचाच बरसला. मराठवाड्याबाबत हवामान तज्ज्ञांसह आयएमडीने जे अंदाज व्यक्त केले, ते पूर्णपणे फोल ठरले. दरम्यान, आयएमडीची 90 टक्के माहिती अचूक असते, असे पुणे आयएमडीचे शास्त्रज्ञ कृष्णानंद होसळीकर यांनी सांगितले. ते म्हणाले की, सध्या कोकण , मध्य महाराष्ट्राच्या काही भागात आणि विदर्भातील बर्‍याच भागांत चांगल्या व दमदार पावसाचा अंदाज आहे, तर मराठवाड्यात पाच दिवस हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल.

हवामान अभ्यासकांचे मत…

मान्सून दाखल, पण तीव्रता कमी : मराठवाड्यात दाखल झालेला मान्सून कमी तीव्रतेचा आहे. अजूनही तो सक्रिय झालेला नाही.
त्यामुळे काही भागांतच हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. सध्या काही हवामान तज्ज्ञ गुगलवर पाहून अंदाज व्यक्त करीत
आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे. मराठवाड्यात अजूनही पेरणीयोग्य पाऊस नाही. त्यामुळे शेतकर्‍यांनी पेरणीची घाई करू
नये. परभणी कृषी विद्यापीठाकडून जेव्हा आवाहन होईल, तेव्हाच  पेरण्या कराव्यात. मराठवाड्यात पुढील पाच दिवस हलक्या व मध्यम
स्वरूपाचा पाऊस आहे, परंतु तो पेरणीयोग्य नसेल.

-कृष्णानंद होसळीकर, मुख्य शास्त्रज्ञ, आयएमडी, पुणे

मान्सून 15 ऑगस्टनंतरच येणार : मराठवाड्यात अजूनही मान्सून आलेला नाही. आयएमडी चुकीची माहिती देत आहे. सध्याचा पाऊस  हा मान्सूनपूर्व आहे. मराठवाड्यात 15 ऑगस्ट ते 28 ऑगस्टदरम्यान मान्सूनचा पाऊस पडेल. वातावरण बदलामुळे पाऊस लांबला आहे. वीज कोसळण्याच्या घटना या मान्सूनपूर्वीच घडतात. तीच परिस्थिती मराठवाडा, विदर्भात दिसते. त्यामुळे शेतकर्‍यांनी आताच पेरण्यांवर खर्च करू नये.

– किरणकुमार जोहारे, हवामान अभ्यासक

मराठवाड्यात पाऊस कमीच : पावसाला सुरुवात होण्यापूर्वी परिस्थिती वेगळी होती. त्यामुळे चांगल्या पावसाची शक्यता व्यक्त केली गेली, परंतु यंदा 20 जून उलटूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. भारतीय हवामान खात्याने यावर्षी सर्वसाधारण पावसाचा अंदाज व्यक्त केला, परंतु प्रशांत महासागराच्या विषुववृत्तावरील सरासरी तापमानात सतत घट होत असल्याने चागला पाऊस पडेल, असे सांगण्यात आले.  आता परिस्थिती बदलली असून, हिंद महासागरातील बदलत्या वातावरणामुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात हे प्रमाण अगदी कमी असेल.

-श्रीनिवास औंधकर, हवामान अभ्यासक, एमजीएम वेधशाळा

SCROLL FOR NEXT