मराठवाडा

बीड : सिंड्रोमने केले डाऊन, योगाने केले अप!

मोहन कारंडे

बीड; उदय नागरगोजे :  सुरेखा शेषराव घुगे… जन्मताच डाऊन सिंड्रोम या आजाराने ग्रस्त… या आजारामुळे शारीरिक व बौद्धिक वाढ मंदावते… प्रारंभी काही उपचार घेतले परंतु काही उपयोग झाला नाही… चालणे- बोलणे कमी असल्याने अनेक अडचणी यायच्या… दरम्यान सात वर्षांपूर्वी बीडमध्ये सुरू असलेल्या योग शिबिराला आई- वडील सुरेखाला घेऊन गेले… आणि हळूहळू बदल दिसू लागला… आज सात वर्षानंतर वजन कमी होण्याबरोबरच बौद्धिक विकासही झाला… एवढेच नाही तर एक दिवस योगाचा वर्गही सुरेखाने घेतला… योगाच्या नियमित साधनेतून आता तिचे जीवन सुकर झाले… एवढेच नाही तर सिंड्रोमने 'डाऊन' केले होते, परंतु आता योगाने तिला 'अप' केले आहे!

योगसाधनेतून आरोग्य सुदृढ राखता येते हे प्राचीन काळातील ऋषीमुनींपासून अगदी आताच्या वैद्यकीय तज्ञांनी सुद्धा मान्य केलेले आहे. याचा अनुभव अनेकांनी घेतलेला आहे. बीड शहरातील रायगड कॉलनी भागात शेषेराव घुगे राहतात. त्यांची मुलगी सुरेखा हीला ट्रायसोमी (डाऊन सिंड्रोम) हा आजार आहे. या आजारात चेहरा वेगळा असणे, मसल्स लूज असणे, बुद्धिमत्ता कमी असणे अशी  लक्षणे असतात. सुरेखा हीला हा आजार असल्याचे समजल्यानंतर घुगे यांनी काही ठिकाणी उपचार घेतले, परंतु यश आले नाही.

यादरम्यान बीडमध्ये पतंजली योग समितीचे अ‍ॅड. श्रीराम लाखे, डॉ.के.डी. पाखरे, डॉ.एस. एच.मोगले यांच्या पुढाकारातून योग शिबीर सुरू करण्यात आले. या शिबिरात आई सुदामती घुगे व वडील शेषराव घुगे हे सुरेखाला घेऊन सहभागी झाले. प्रारंभीच्या काळात तिला योगासने व ध्यान या क्रिया करता येत नव्हत्या. परंतु सुरेखाला योगाची आवड निर्माण झाल्याने ती दररोज न चुकता योगवर्गाला जाण्याचा हट्ट करत असे. यामुळे पालक तिला योगवर्गाला घेऊन येत. गत सात वर्षांपासून योगसाधनेत सातत्य राखल्याने तिच्यामध्ये सकारात्मक बदल घडत गेले. आता सुरेखा संवाद साधू शकते. चालता फिरताना आधाराची गरज पडत नाही, बुद्धीतही फ रक पडला आहे.

कुटुबीयांबरोबरच योगवर्गात येणारे डॉक्टर्स मंडळींसह इतरांनाही ती नावासह ओळखते. तिच्यामध्ये झालेली ही सुधारणा पालकांना निश्चितच सुखावणारी आहे. यामुळे तेही तिच्या योगसाधनेच्या आवडीला प्रोत्साहन देतात. तिच्या योगसाधनेत एकही दिवस खंड पडणार नाही, याची काळजी घेतात. डाऊन सिंड्रोमसारखा आजार असणार्‍या सुरेखाचे जीवन योगसाधनेने सुकर आणि सुसह्य झाल्याने शेषराव घुगे व सुदामती घुगे यांनी योगवर्गातील प्रशिक्षक व योगसाधकांचे आभार व्यक्त केले आहेत.

योगवर्गात कौटुंबिक भावना

बीडमध्ये सुरू असलेल्या योगवर्गात अतिशय कौटुंबिक वातावरण असते. सुरेखा ही नियमीतपणे या वर्गात सहभागी होते. या ठिकाणी प्रशिक्षक अ‍ॅड. श्रीराम लाखे, डॉ.के.डी. पाखरे, डॉ.मोगले यांच्यासह त्यांचे सहकारी सुरेखाची विशेष काळजी घेतात. तिला प्रोत्साहन देतात. यातूनच काही दिवसांपूर्वी सुरेखाने योगवर्ग घेऊन सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला.

डाऊन सिंड्रोमने त्रस्त असलेल्या सुरेखामध्ये योगसाधनेने चांगले बदल घडले आहेत. योगसाधनेमुळे मेंदूसह सर्व अवयवांना ऑक्सिजनयुक्त रक्तपुरवठा वाढतो. यामुळे हॅप्पी हार्मोन्समध्ये वाढ होते. स्मरणशक्ती, आकलनशक्ती, एकाग्रता वाढते. योगसाधनेत सातत्य राखल्याने झालेले हे बदल निश्चितच दखल घेण्यासारखे आहेत.

-डॉ.एस.एच. मोगले, मानसोपचारतज्ञ, बीड

SCROLL FOR NEXT