मराठवाडा

बीड : पंकजा मुंडेंनी फुंकले जि.प. निवडणुकीचे रणशिंग

मोहन कारंडे

बीड, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील सत्ताधार्‍यांकडून जनतेची घोर निराशा झाली आहे. कुठला निधी नाही की कामे नाहीत, त्यामुळे त्यांना मतदान करण्याची मानसिकता मतदारांमध्ये राहिली नाही. तुमच्यासाठी मी रणांगणात उतरले आहे, जिंकण्यासाठी आतापासूनच कामाला लागा. जिल्हा परिषदेत पुन्हा आपलीच निर्विवाद सत्ता येणार आहे, असा दृढ विश्वास भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.

आष्टी, पाटोदा व शिरूर तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांची संघटनात्मक बैठक बुधवारी लक्ष्मी मंगल कार्यालयात पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार भीमसेन धोंडे, आमदार सुरेश धस यावेळी उपस्थित होते. या बैठकीत पंकजा मुंडे यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकत पदाधिकार्‍यांना कानमंत्र दिला. आष्टी हा जिल्ह्यात सर्वाधिक ताकदीचा मतदारसंघ आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी मी इथून सुरू करत आहे. लोकनेते मुंडे यांचे नाव जसे गावागावात झाले, तसे कामाच्या माध्यमातून प्रत्येक गावात पोहचण्याचा मी प्रयत्न केला आहे. पालकमंत्री म्हणून सत्तेच्या काळात काम करताना जातीसाठी नाही तर मातीसाठी काम केले. कुठलाही भेदभाव केला नाही. ग्रामीण भागात रस्ते, पाणी, वीज या मूलभूत समस्यांसह विविध विकासकामे केली. शेतकरीवर्ग माझ्या काळात आनंदी होता, पण आज परिस्थिती उलट आहे. सत्ताधार्‍यांचे जिल्ह्याकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. माझ्या काळात जो निधी आला, त्याचीच कामे आणि उद्घाटने आजही सुरू आहेत. विम्याचा तसेच वीजबिल वसुलीचा प्रश्न गंभीर बनल्याने शेतकरी चिंतातुर आहे. माझा विरोध अथवा टीका ही एखाद्या व्यक्तीविरुध्द नाही, तर प्रवृत्तीविरुध्द आहे. सत्ताधार्‍यांना संधी देऊन पाहिली, पण त्यांना काही करता आले नाही.

आज जिल्ह्यात सर्वच बाबतीत जी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे, ती अधिक चिंताजनक असल्याचे पंकजा म्हणाल्या. यावेळी धोंडे व धस यांनी दोघे मिळून पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकून जिल्हा परिषद पुन्हा ताब्यात आणू, असा विश्वास दिला. ताई पालकमंत्री असताना झालेली कामे उल्लेखनीय होती. आता तशी कामे होत नाहीत. सत्ताधारी केवळ टक्केवारीच्या मागे लागलेत असा घणाघात आ. धस यांनी केला. या बैठकीस राजेंद्र मस्के, विजय गोल्हार, वाल्मिक निकाळजे, बबन झांबरे, रामराव खेडकर, दशरथ वनवे, जयदत्त धस, अजय धोंडे, राम कुलकर्णी, अमोल तरटे, सुवर्णा लांबरूड, उषा मुंडे, सविता गोल्हार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रत्येक गटात जाणार

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत आपण पूर्ण लक्ष घालणार आहोत, त्यासाठी प्रत्येक गटाचा दौरा करणार असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. सर्वाना एकत्रितपणे काम करावे लागेल. विरोधकांना आगामी विधानसभा निवडणुकीत प्रचाराला सुध्दा माणूस मिळाला नाही पाहिजे. निवडणुकांना जिंकण्याच्या इर्षेने यशस्वीपणे कामाला लागा असे आवाहन त्यांनी केलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT