नेकनूर ; मनोज गव्हाणे : विजयादशमीला काही साखर कारखान्याचे बॉयलर पेटणार असल्याने ऊसतोड मजुरांची मार्गस्थ होण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. परंतु जनावरांचे आठवडी बाजार बंद असल्याने ऊस वाहतुकीसाठी लागणार्या गाडीला बैलांचा शोध मजुरांकडून घेतला जातो आहे. जनावरांच्या बाजारासाठी जिल्ह्यातील नेकनूर, हिरापूर, साळेगाव ही गावे प्रसिद्ध आहेत. मात्र महिनाभरापासून लंपी या आजाराच्या संसर्गाचा धोका असल्याने या गावचे बाजार बंद आहेत. यामुळे बैल सध्या खरेदी विक्रीसाठी मोबाईल हा दुवा बनला असला तरी मनपसंत खरेदी करण्यास अडचण निर्माण होत असल्याची खंत मजुरातून व्यक्त होत आहे. ऑगस्ट, सप्टेंबरपासूनच पश्चिम महाराष्ट ?सह कर्नाटकातील साखर कारखाने मुकादमाकरवी मजुरांना उचल देऊन करार करतात यासाठी ऊसतोड मजुरांना वाहतुकीसाठी लागणार्या गाड्यांसाठी मोठ्या बैलांची आवश्यकता असते. मात्र लंपी आजाराने जिल्ह्यातील जनावरांचे मोठे बाजार महिनाभरापासून बंद झाल्याने मजुरांना बैलांचा शोध घ्यावा लागत आहे. यासाठी मोबाईल माध्यम बनले असले तरी मनपसंत
बैलांची यातून पूर्तता होत नसल्याने मजुरांना चांगल्या बैलांच्या शोधात फिरावे लागत आहे. यासाठी वेळ आणि पैसा जात असून आता
तर कारखाने सुरू होऊ लागल्याने लवकरात लवकर बैलजोडी खरेदी करून मार्गस्थ होण्यासाठी मजुरांची धावाधाव सुरू झाली
आहे.
चांगल्या बैलांना लाखाच्या पुढे भाव मिळत आहे. जनावरांचे बाजार बंद असल्याने इतर व्यवहारही अडचणीत आले आहेत. कर्नाटक आणि पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यांना जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात ऊसतोड मजूर जातात या मजुरांना उचल दिली जाते. यातूनच हे मजूर पुढील चार महिन्यांसाठी लागणार्या धान्यासह बैलांची खरेदी करून बॉयलर पेटण्याच्या दरम्यान मार्गस्थ होतात. सध्या तयारी करून बिर्हाड हलवण्याची तयारी मजूर करीत असून सध्या याची लगबग सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने काही नियमांचे पालन
करून जनावरांचे बाजार काही दिवसांसाठी तरी सुरू करावेत, अशी मागणी ऊसतोड मजुरांमधून होत आहे.
ऊस वाहतूक करण्यासाठी मोठ्या बैलांची गरज असते. मात्र सध्या जनावरांचे आठवडी बाजार बंद असल्याने अशा बैलांचा शोध घेणे अवघड बनले आहे. त्यातच कारखान्याचे बोलावणे आले असून चार दिवसांत जावे लागणार आहे. त्यामुळे आता मिळतील तशी
बैलजोडी घ्यावी लागेल. ऊसतोड मजुरांची ही अडचण लक्षात घेऊन व्यापारी दर वाढवून सांगत असल्याने भुर्दंड सहन करावा लागत आहे.
जगन्नाथ मुंडे, ऊसतोड मजूर, निवडुंगवाडी