पैठण पुढारी वृत्तसेवा: पैठण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून, अतिवृष्टी अनुदान हेक्टरी १४००० प्रमाणे देण्यात यावे. यासह शासन धोरणानुसार पावसाचा खंड २१ दिवस झाल्यामुळे पिक विम्याची २५ टक्के रक्कम मिळावी. यासाठी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (दि. ४) रोजी सकाळी पैठण तहसील कार्यालयासमोर निदर्शने करून आपल्या मागणीचे निवेदन तहसीलदार यांना दिले आहे.
तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विनोद तांबे, माजी आमदार संजय वाघचौरे, यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी पैठण तालुक्यातील हिरडपुडी व आपेगाव बंधाऱ्यात व खर्डामध्य प्रकल्प पाणी सोडण्यासाठी सोमवारी तहसिल कार्यालयाच्या परिसरात आघाडीचे पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्यासह राज्य शासनाच्या विरुद्ध घोषणाबाजी करून निदर्शने केले.
यावेळी विविध मागणीचे निवेदन तहसीलदार सारंग चव्हाण यांना देण्यात आले. माजी आमदार संजय वाघचौरे, बद्रीनारायण भुमरे, तालुकाप्रमुख मनोज पेरे, सोमनाथ जाधव,अंकुश रांधे, ज्ञानेश्वर कापसे, प्रमोद सरोदे, अजय परळकर, निमेश पटेल, प्रकाश वानोळे,राजू परदेशी, कल्याण भुकेले, नंदकिशोर नजन, पवार, दिलीप सानवे, दादू पटेल, मगरे इत्यादी महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.