लातूर; शहाजी पवार : भारतीय स्वातंत्र्य संग्रामास खर्या अर्थी पूर्णत्व प्रदान करणार्या हैदराबाद मुक्तिसंग्रामासाठी तत्कालिन अनेक वृतपत्रांनी आपले योगदान दिले. जनसंपर्काचे अन् समाजमन घडवण्याचे प्रभावी साधन तसेच देशसेवेचा एक प्रभावी मार्ग म्हणून या काळात वृत्तपत्रांनी आपली ओळख समाजाला दिली. 'पुढारी'ने अग्रलेख अन् बातम्यांच्या माध्यातून हैदराबाद संस्थानातील वास्तव मांडले व तिथे निजामाकरवी प्रजेची होत असलेली परवड प्रभावीपणे प्रकाशात आणली.
लातूरचे रहिवासी तथा जळगाव येथील प्रा. प्रशांत देशमुख यांनी 'हैदराबाद मुक्तिसंग्रामात वर्तमानपत्राची भूमिका' यावर डॉक्टरेट मिळवली आहे. हैदराबाद मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी या पुढारीने संवाद साधला. देशमुख यांनी या लढ्यातील 'पुढारी'चे योगदान स्पष्ट केले.
प्रा. प्रशांत देशमुख म्हणाले, निजामाच्या संस्थानापेक्षा राजर्षी शाहू महारांजांचे कोल्हापूर संस्थान लोकसंख्या, भूविस्तार आणि उत्पन्नाच्या मानाने भलेही लहान असले तरी सुधारणा, प्रजाहित अन विचारात ते हैदराबाद संस्थानापेक्षा कितीतरी पुढे आहे हे वेळोवेळी पुढारीने दाखवले व तशा सुधारणा निजामशाहीने कराव्यात अशी भूमिकाही मांडली. जनतेत संघटन होवू नये, ब्रिटिश साम्राज्य बलिष्ठ रहावे यासाठी निजामाने पॅलेस्टाईन दिन साजरा करण्यावर बंदी घातल्याचे मत 'पुढारी'ने स्पष्टपणे नोंदवले होते. निजामाच्या मध्युगीन कारभाराचा या वृत्तपत्राने निषेधच केला. संस्थानाचा कारभार लोकमतानुसार व्हावा यासाठी अग्रलेखातून घेतलेला पुढाकार परिणामकारक होता. निजामाची मानसिकता ओळखून त्याच्या सावध पावित्र्याचा गांभीर्याने विचार करुन हिंदुस्थानातील पाकिस्तानची पाळेमुळे खणून काढणे आवश्यक आहे, अन्यथा स्वातंत्र्याच्या संध्येला हा अस्तिनातील निखारा तापदायक ठरेल हा सूचक इशाराही देण्यास हे दैनिक विसरले नव्हते, असे त्यांनी सांगितले. हैदराबाद संस्थानात निझामाकडून वर्तमानपत्रांची मुस्कटदाबी करण्यात आली, असे ते म्हणाले.
एकंदरीत या दैनिकाने हैदराबाद स्टेट काँग्रेस लढा, वर्हाडाचा प्रश्न, रझाकारांचे अत्याचार याची नोंद घेतली. प्रजा परिषदेच्या लढ्याला सहाय्यता दिली. संस्थानातील चळवळीला पाठिंबा देऊन जनजागृतीचे कार्य केले. हैदराबाद संस्थान, मध्युगीन वारसा, सरंजामाशाही व्यवस्था व अत्याचारी धोरण करणारे संस्थान आहे असे 'पुढारी'चे मत होते असेही देशमुख यांनी सांगितले.