मराठवाडा

नांदेड : बावनकुळेंच्या आरोपानंतर यात्रेचा खर्च चर्चेत…!

दिनेश चोरगे

 नांदेड; संजीव कुळकर्णी :   खा.राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नांदेड जिल्ह्यात दाखल होण्यापूर्वीच भाजप आणि अन्य पक्षांकडून टीका सुरू झाली होती. या यात्रेचे आगमन झाल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भ्रष्टाचाराच्या पैशांतून यात्रा पार पाडली जात आहे, असा आरोप केला. त्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी लगेच उत्तर दिले असले, तरी आरोप-प्रत्यारोपांमुळे यात्रेदरम्यानच्या प्रचंड खर्चाची बाब चर्चेत आली आहे.

राहुल यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात सर्वप्रथम नांदेड जिल्ह्यात दाखल होणार, हे जेव्हा स्पष्ट झाले, त्याच सुमारास राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले होते. त्यानंतर यात्रेच्या नियोजनाची तयारी सुरू झाली
तेव्हा आधीच्या सरकारमधील काही ज्येष्ठ मंत्र्यांवर खर्चाचा मोठा भार टाकण्यात आला, असे काँग्रेस पक्षातूनच सांगितले जात होते. यात्रेच्या पूर्वतयारीची पहिली बैठक नांदेडमध्ये माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाली. त्यावेळी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी भोजन व्यवस्थेत साधेपणा राखला होता. पण आता यात्रेदरम्यान
ठिकठिकाणची निवास आणि भोजन व्यवस्था, नांदेड शहरातील नामांकित हॉटेलांमधील बहुसंख्य खोल्यांचे झालेले आरक्षण, वाहतूक व्यवस्था, जाहीर सभेचे व्यासपीठ व आसन व्यवस्था, प्रसिद्धी, आदरातिथ्य अशा एक नाही, तर अनेक बाबींवर प्रचंड खर्च झाल्याचे दिसत आहे. यातील काही खर्चाचा भार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने तर उर्वतिर भार काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि अन्य आजी-माजी लोकप्रतिनिधींनी उचलला असल्याचे पक्षातून सांगितले जात आहे.

नांदेड जिल्हा काँग्रेस पक्षाचे बँकेमध्ये खाते असले, तरी पक्षाच्या तिजोरीत खडखडाट असल्याचे सांगितले जाते. यात्रेच्या स्वागताच्या तयारीचे प्रत्यक्ष नियेाजन सुरू झाल्यापासून गेल्या दोन महिन्यांत नेमका किती खर्च झाला, याची अधिकृत माहिती कोणीही देत नाही; पण यात्रेच्या आगमनानंतर दिसणार्‍या भपकेबाजपणाची व्याप्ती लक्षात घेता, खर्चाचा आकडा कोट्यवधीत असावा, असे दिसते. नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस पक्षावर अशोक चव्हाण यांचे निर्विवाद वर्चस्व आहे. त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात शेकडो कार्यकर्त्यांना राजकीय संधी मिळाली. आजी-माजी नगरसेवक, जि.प.सदस्य आणि आमदार अशा अनेकांनी तयारीच्या खर्चाचा हातभार लावला, तरी सर्वात मोठा भार अशोक चव्हाण यांना उचलावा लागला.

काँग्रेसच्या राष्ट्रीय व प्रदेश स्तरावरील प्रमुख नेत्यांची नांदेडमध्ये चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे. त्यात चव्हाण यांच्या यंत्रणेने कोठेही काटकसर केलेली नाही. यात्रेदरम्यानच्या मुक्काम आणि मधल्या विश्रांतीच्या ठिकाणीही भोजन व इतर सोयीसुि वधांत कशाचीही कमतरता नव्हती. या भपकेबाज व्यवस्थेमुळे पढच्या जिल्ह्यातील
संयोजकांवर मोठे दडपण येऊ शकते, असे बोलले जात आहे. या पोर्शभूमीवर भाजप प्रदेशाधयक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भ्रष्टाचाराच्या पैशांतून यात्रा पार पाडली जात असल्याचा आरोप मंगळवारी केल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह सचिन सावंत यांनी त्यावर पलटवार केला. पण अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात प्रभृतींनी भाजपच्या आरोपाला कोणतेही उत्तर दिले नाही.

बावनकुळेंचा आरोप अन् नानाजींचा 'तो' सवाल

भाजपच्या बावनकुळे यांनी काँग्रेसच्या यात्रेतील खर्चाच्या मुद्यावरून आरोप केल्यानंतर काँग्रेसचे आमदार अमरनाथ राजूरकर यांनी नानाजी देशमुख यांनी 2006 साली संघाचे तत्कालीन कार्यवाह मोहन भागवत यांना पाठविलेल्या पत्राकडे लक्ष वेधले. 2004 च्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यावर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक मुंबईत
सप्ततारांकित हॉटेलमध्ये घेण्यात आली. त्यावर नापसंती दर्शवून नानाजींनी भाजपकडे इतका पैसा आला कोठून असा सवाल उपस्थित केला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT