मराठवाडा

नांदेड : चोरीचा केलेला बनाव महिलेच्या आला अंगलट

मोहन कारंडे

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : नांदेडचे नाव उच्चारले, की गुन्हेगारीचे आगार असे चित्र निर्माण होत आहे. घरफोडीच्या घटनांत वाढ होत असताना या घटनांचा तपास लागत नाही की पोलिसांची मानसिकता नाही, असा प्रश्न विचारला जातो. मात्र, या प्रश्नाला छेद देत वजिराबाद ठाण्यातील 'डिटेक्शन ब्रँच'ने चोरीचा एक मोठा आणि चर्चित गुन्हा 'डिटेक्ट' केला आहे. या प्रकरणात घरातीलच महिला आरोपी असल्याने पोलिसांसमोर तपासाचे आव्हान निर्माण झाले होते, परंतु पोलिसांनी अत्यंत कुशलतेने हे प्रकरण हाताळत महिला आरोपीस अटक तर केलीच, शिवाय 14 लाखांचा ऐवजही परत मिळविण्यात यश मिळविले.

बुधवार दि. 8 जून रोजी मध्यरात्रीनंतर शहरात पावसाने हजेरी लावल्याने अनेक ठिकाणची वीज गुल झाली होती. अचानक खंडित झालेल्या वीजपुऱवठ्याचा फायदा घेत चोरट्यांनी वजिराबाद भागातील तीन दुकाने आणि गवळीपुरा भागातील एक घर फोडले होते. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यांपैकी गवळीपुरा येथील घरात झालेली चोरी ही सुमारे 14 लाख रुपयांची असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण केले गेले. फय्युम अब्दुल गफार कुरेशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या खोलीमधील आलमारीचे लॉकर तोडून आत ठेवलेली 13 लाख रुपयांची रोकड, 15 ग्रॅम सोन्याची गळसरी, 5 ग्रॅमचा पत्ता आणि 5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असे एकूण 14 लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. मागील काही दिवसांत पोलिसांनी अनेक चोरटे पकडून तुरुंगात डांबल्याने एवढी मोठी चोरी कशी झाली, कोणी केली असावी, या प्रश्नाने ते चक्रावले होते.

या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चोरी झाली, त्या वेळी कुरेशी यांच्या घरात कोणताही चोरटा शिरला नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर घरातील कोणीतरी चोर असावा, असा संशय पोलिसांचा बळावला. आता पोलिसांनी त्या दृष्टिकोनातून तपास सुरू केला होता. दरम्यान, कुरेशी यांच्या पत्नीवर तपास येऊन थांबला होता, मात्र महिला असल्याने अटक कशी करायची किंवा अन्य प्रक्रिया कशी हाताळायची, हा प्रश्न पोलिसांसमोर होता. त्यातून पोलिसांनी मार्ग काढत घरातील प्रत्येक सदस्याची उलट तपासणी केली. त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. शेवटी आरोपी महिलेला ठाण्यात बोलावून चौकशी केली असता तिने चोरी केल्याचा साफ इन्कार केला, परंतु पोलिसांनी 'पोलिसी भाषा' वापरताच ती पोपटासारखी बोलू लागली आणि चोरी केल्याची कबुलीही दिली.

चोरी केलेला संपूर्ण ऐवज देगलूर नाका येथील माहेरी लपवून ठेवला होता. तो पोलिसांना काढून दिला. त्या महिलेला अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने तिला एक दिवसाच्या पोलिस कोठडीत पाठविले आहे. पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलिस अधीक्षक नीलेश मोरे, विजय कबाडे, पोलिस उपाधीक्षक चंद्रसेन देशमुख, वजिराबादचे पोलिस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या नेतृत्वाखाली 'डिटेक्शन ब्रँच' प्रमुख संजय निलपत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक गजानन किडे, विजय नंदे, संतोष बेलूरोड, शेख इम्रान, रमेश सूर्यवंशी, शुभांगी कोरेगाव यांच्या पथकाने गुन्ह्याचा छडा लावला.

फय्युम कुरेशी यांचे घर एकत्रित कुटुंब पद्धतीचे आहे. ते आपल्या तीन भावांसह गवळीपुरा येथे एकाच घरात वास्तव्यास आहेत. चौघा भावांचा एकच आणि एकत्र व्यवसाय असून ते त्यातून मिळालेले उत्पन्न घरातील कपाटात ठेवतात. ही बाब सर्वांनाच माहिती होती. परंतु कुरेशी यांच्या पत्नीचे आपले स्वतःचे मोठे घर असावे, असे स्वप्न होते. यासाठीच तिने चोरीचा बनाव केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT