भोकरदन, पुढारी वृत्तसेवा : गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकबदली प्रक्रियेस यंदा वेग आला आहे. जिल्हांतर्गत, आंतरजिल्हा बदलीकरिता शासन स्तरावरून ऑनलाइन प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. सदर प्रणालीवर प्राथमिक शिक्षक बदली करता शासनाकडून संभाव्य वेळापत्रक जाहीर केल्याची माहिती शिक्षण विभागाच्या सूत्रांनी दिली.
कोरोनामुळे दोन वर्षांपासून शिक्षकांची बदली प्रक्रिया रखडली होती. मात्र, कोरोनाचे सावट कमी झाल्याने यंदा बदल्या करण्यासाठी शासनाने हिरवा झेंडा दाखवला आहे. शिवाय बदली पारदर्शी करण्यासाठी नव्याने सॉफ्टवेअर विकसित केले आहे. त्याची यशस्वी चाचणी झाली आहे. त्यामुळे बदली प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. नुकतीच बदली पोर्टलवर अवघड शाळांची यादी प्रसिद्ध झाली. 13 ते 20 जून बदली पोर्टलवर शिक्षकांनी माहिती अद्ययावत आणि सबमिट करणे, 14 ते 24 जून शिक्षकांनी शिक्षण अधिकार्याकडे अपील
सादर करणे, 14 ते 26 जून शिक्षण अधिकार्यांनी अपील तपासणे, 14 ते 28 जून शिक्षकांनी प्रोफाइल स्वीकारणे, गटशिक्षणाधिकारी सक्तीची स्वीकृती करणे 29 जून ते 1 जुलै, शिक्षकांनी सार्वजनिक आक्षेप घेणे 24 जून ते 3 जुलै आणि 4 व 5 जुलै मुख्य कार्यकारी अधिकारी सार्वजनिक आक्षेपांची सुनावणी करणे, अशा प्रकारे बदलीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यावेळा पत्रकानुसार शिक्षक बदल्यांची लगीनघाई शिक्षण विभागाकडून सुरू झाली आहे. यामुळे शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.
गेल्या दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर यावर्षी शिक्षक बदल्यांचा मुहूर्त सापडल्याने बदलीपात्र शिक्षकांच्या चेहर्यावर समाधान झळकत आहे. अवघड आणि दुर्गम क्षेत्रातील शिक्षकांनाही मोठा दिलासा मिळाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.