जालना : पुढारी वृत्तसेवा
जालना शहरातील गीतांजली कॉलनी येथे महावितरणच्या कर्मचाऱ्यास मारहाण करण्यात आली. या प्रकरणी चंदनझीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या मारहाणप्रकरणी चंदनझीरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, रतन धोंडीबा सोनवणे हे महावितरणचे तंत्रज्ञ एमआयडीसी शाखा येथे नाईट ड्युटी करत असताना महावितरणच्या कार्यालयात गीतांजली कॉलनी येथून फोन आल्याने पहाटे चार वाजता दुरुस्तीसाठी गेले होते परंतु पोलवर अंधार असल्याकारणाने ते परत आले.
काम करण्यासाठी ते पुन्हा सकाळी सहा वाजता लाईट दुरुस्तीसाठी गेले असता अजिज खान या इसमाने रतन धोंडीबा सोनवणे यांच्याशी वाद घालून त्यांना शिवीगाळ करत व मारहाण केल्याची तक्रार रतन सोनवणे याने चंदनझीरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून चंदनझी पोलीस ठाण्यात कलम 353, 332 आणि 504 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलीस सूत्रांकडून माहिती मिळाली.
महावितरणच्या कर्मचाऱ्यास मारहाण झाल्याचे वृत्त कळताच बहुजन विद्युत फोरमचे पदाधिकारी चंदनझीरा पोलीस ठाण्यात जमा झाले. फोरम चे केंद्रीय उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, गणेश गजर, श्रीकांत वादे, नंदू पवार, अमोल मदन,रवी पवार, रमेश खरात, सचिन शिंदे इत्यादींनी महावितरणचे अधिक्षक अभियंता यांची भेट घेऊन घटनेची सविस्तर माहिती दिली.
यावेळी बोलताना महावितरण चे आधिक्षक अभियंता पठाण यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले की महावितरणच्या कर्मचाऱ्यांना काम करत असताना सहकार्य करावे अशा प्रकारची मारहाण निंदनीय असल्याचे यावेळी बोलताना पठाण म्हणाले.