मराठवाडा

परभणी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता समितीच्या बैठकीचा उडाला फज्जा

अमृता चौगुले

गंगाखेड (परभणी ),पुढारी वृत्‍तसेवा : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता समितीच्या बैठकीत आमदार रत्नाकर गुट्टे व पोलीस अधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी झाली. आ.गुट्टे यांनी पोलीस ठाण्याचे एपीआय व बीट जमादार हप्ते घेत असल्यामुळे अवैध धंद्याचा धुमाकूळ माजल्याचा आहे, असा आरोप केला. तसेच एपीआय सुनील माने यांना धारेवर धरल्याने तेथे उपस्थित आयपीएस पोलीस अधिकारी श्रेणिक लोढा, एपीआय सुनील माने यांनी आरोप फेटाळून लावत लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यात शाब्दिक खडाजंगी झाली. यामूळे शांतता समितीच्या बैठकीचाच फज्जा उडाला.

याबाबतची अधिक माहिती अशी की, सोमवारी (दि.२९) शहरातील श्री संत जनाबाई महाविद्यालयात सकाळी ११:३० वाजता पोलीस प्रशासनाच्या वतीने शांतता समितीचे आयोजन करण्यात आले होती. आ.रत्नाकर गुट्टे यांच्या मुख्य उपस्थितीत झालेल्या या बैठकीस मार्गदर्शक म्हणून एसडीएम सुधीर पाटील यांचेसह आयपीएस पोलीस अधिकारी श्रेणिक लोढा होते. तहसीलदार, बीडीओ, महावितरणचे अभियंता, वैद्यकीय अधिकारी, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष, जिल्हा शांतता समितीचे सदस्य, माजी उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी, सा.बां. उपविभागाचे अभियंता आदी उपस्थित होते.

आगामी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर व तालुक्यात शांतता नांदावी म्हणून आयोजित करण्यात आलेली बैठकच अशांततेची व वादाची ठरली. यावेळी आमदार गुट्टे यांचे पोलीस प्रशासनाबद्दलचे हप्तेखोरीचे आरोप केले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरासह परिसरात अवैध धंद्यांचा धुमाकूळ माजला असेल तर शांतता कशी प्रस्थापित होईल असे सुनावत एपीआय सुनील माने यांच्या कार्यपद्धतीवर आमदारांनी आक्षेप घेत, एपीआय व बीट जमादार हप्ते खात असल्याचा आरोप केला. एपीआय माने यांनी आरोप फेटाळजत आमदार व एपीआय यांच्यात शाब्दिक वाद झाला.

प्रत्युत्तर देत असलेल्या एपीआय माने यांची शैली पाहून आ.गुट्टे चांगलेच भडकले व त्यांनी एपीआय यांची खरडपट्टी काढली. हा प्रकार जाहीररीत्या व मीडियासमोर सुरू असल्याने आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या या भूमिकेस आयपीएस पोलीस अधिकारी श्रेणिक लोढा यांनी जोरदार आक्षेप घेऊन पोलिसांची प्रतिमा अशा बिघडवू नका असे सांगत आमदारांना रोखण्याचा प्रयत्न केला.

मात्र, हा वाद सुमारे १० ते १५ मिनिटे सुरू असल्याने एकूण शांतता समितीच्या बैठकीचा फज्जाच उडाला. शेवटी उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यामध्ये हस्तक्षेप करून पुढील वाद मिटवला. वाद शमल्यानंतर एसडीएम सुधीर पाटील यांनी आपल्या मनोगतात शहराचा गणेशउत्सव हा राज्यात आदर्श कसा ठरेल याबाबत नागरिकांसह गणेश मंडळ पदाधिकारी, सदस्यांनी शांततेच प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी केले. या बैठकीस शहरातील शांतता समितीचे सदस्य, व्यापारी प्रतिनिधी, गणेश मंडळाचे प्रतिनिधी व विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT