मराठवाडा

औरंगाबादमध्ये सेनेचे आज शक्तिप्रदर्शन

मोहन कारंडे

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : औरंगाबाद मध्यचे आमदार प्रदीप जैस्वाल आणि औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांच्या विरोधात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. पक्षाच्या वतीने उद्या बुधवारी क्रांती चौक येथून वाहन रॅली काढण्यात येणार असून ही रॅली बंडखोर आमदारांच्या कार्यालयांसमोरून जाणार आहे.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे जवळपास 39 आमदार फुटून बाजूला गेले आहेत. या बंडखोर आमदारांमध्ये सर्वाधिक पाच आमदार हे औरंगाबाद जिल्ह्यातील आहेत. औरंगाबाद मध्यचे आमदार प्रदीप जैस्वाल, पश्चिमचे आमदार संजय शिरसाट, पैठणचे आमदार तथा कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे, सिल्लोडचे आमदार तथा राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांचा समावेश आहे. आमदारांच्या बंडखोरीविरोधात राज्यभरात तीव्र पडसाद उमटले. औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात मात्र तशी तिखट प्रतिक्रिया उमटली नव्हती. आम्ही सगळे शिवसेनेसोबतच आहोत अशी मोघम प्रतिक्रिया बहुतेक पदाधिकारी, कार्यकर्ते देत होते. मात्र, आता बंडाच्या पाच दिवसांनंतर संघटनात्मक पातळीवरून शहरातील दोन्ही बंडखोर आमदारांविरोधात शक्तिप्रदर्शनाची तयारी करण्यात आली आहे. क्रांती चौक येथून सकाळी 10 वाजता वाहन रॅली काढण्यात येणार आहे. ही रॅली दोन्ही आमदारांच्या कार्यालयांसमोरून जाणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT