औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : सेनेचे पश्चिमचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी निधी वाटपात आपल्यावर अन्याय होत असल्याचा आरोप केलेला आहे. वास्तविक पाहता राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील विविध विकासकामांसाठी सुमारे 150 कोटींचा निधी मंजूर केला. त्यातील सर्वाधिक 57 कोटींची कामे एकट्या संजय शिरसाट यांच्या पश्चिम मतदारसंघात झाली हे विशेष.
शिवसेनेचा बालेकिल्ला अशी जिल्ह्याची ओळख आहे, परंतु याच जिल्ह्यातील सर्वाधिक पाच सेना आमदारांनी बंडखोरी केली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडावे, अशी अटदेखील या बंडखोर आमदारांनी घातली आहे. स्वपक्षाचे मुख्यमंत्री असतानाही मतदारसंघातील विकासकामांना निधी दिला नसल्याचा आरोपदेखील या बंडखोर आमदारांनी केला आहे. या बंडखोर सेनेचे प्रमुख नगरविकासमंत्री शिंदे यांच्या मंत्रालयामार्फत जिल्ह्यातील सेना आमदारांना सर्वाधिक निधी देण्यात आल्याची माहिती नगरपालिका प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीतून पुढे आली आहे.
गेल्या अडीच वर्षांत नगरविकास मंत्रालयाद्वारे पश्चिम मतदारसंघाचे आ. संजय शिरसाट, मध्य मतदारसंघाचे आ. प्रदीप जैस्वाल, रोजगार हमी योजनेचे मंत्री संदीपान भुमरे या तीन बंडखोर आमदारांच्या मतदारसंघांसाठी 73 कोटींचा निधी मंजूर केला. त्यातून विकासकामेही पूर्ण झाली आहेत. यासोबतच आ. अंबादास दानवे, आ. सतीश चव्हाण, माजी खा. चंद्रकांत खैरे, भाजपचे आ. हरिभाऊ बागडे, खा. इम्तियाज जलील यांनी केलेल्या मागणीवरूनही निधी वितरित करण्यात आला आहे. आतापर्यंत 114 कोटींच्या निधीतील विकासकामांना प्रशासकीय मंजुरी दिली आहे.
शहरातील पश्चिम, मध्य मतदारसंघाच्या सेना आमदारांचाही बंडखोरांमध्ये समावेश आहे. त्यात नुकतेच मुख्यमंत्री ठाकरे यांनी बंडखोर मंत्र्यांकडील खात्यांची जबाबदारी इतर मंत्र्यांवर सोपविल्याने या दोन मतदारसंघातील मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या कामांना ब्रेक लागण्याची दाट शक्यता आहे. सध्या 35 कोटींची कामे शिल्लक असल्याचे सांगण्यात येत आहे.
आ. संजय शिरसाट- 57 कोटी
आ. प्रदीप जैस्वाल- 15 कोटी
आ. हरिभाऊ बागडे- 5 कोटी
आ. सतीश चव्हाण- 80 लाख
आ. अंबादास दानवे- 14 कोटी 95 लाख
मा. खा. चंद्रकांत खैरे- 12 कोटी
खा. इम्तियाज जलील- 2 कोटी 50 लाख