मराठवाडा

औरंगाबाद : खबरदार! परवानगीशिवाय सुटीच्या दिवशीही मुख्यालय सोडाल तर…

मोहन कारंडे

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेतील स्वच्छंद वागणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍यांची प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी चांगलीच कोंडी केली आहे. कर्तव्यावर असतानाच नव्हे, तर सार्वजनिक सुटीच्या दिवशीही वरिष्ठांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, अन्यथा शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, अशी तंबीच त्यांनी दिली आहे.

यासंदर्भात पालिका प्रशासकांनी शुक्रवारी (दि. 19) कार्यालयीन आदेश काढले. आदेशात म्हटले, की पालिकेतील अधिकारी व कर्मचारी हे वरिष्ठांना अवगत न करता किंवा पूर्वपरवानगी न घेता, परस्पर रजेवर जात असून मुख्यालयदेखील सोडतात. त्यामुळे कार्यालयीन कामकाजात अडथळा निर्माण होत आहे. हे कार्यालयीन कामकाजाच्या दृष्टीने योग्य नाही. या आदेशाद्वारे मनपा अधिकारी, कर्मचार्‍यांना सूचित करण्यात येते की, कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी व सार्वजनिक सुटीच्या दिवशी आपल्या वरिष्ठांची पूर्वपरवानगी घेतल्यानंतरच मुख्यालय सोडावे. यापुढे विनापरवानगी व रजा न घेता मुख्यालय सोडल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांविरुद्ध कडक शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. याची सर्व संबंधितांनी गांभीर्याने नोंद घ्यावी आणि या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे. असे आदेशात नमूद केले आहे.

अनेकांची होणार कोंडी

पालिकेतील अधिकारी, कर्मचारी हे कर्तव्यावर असतानाही कार्यालयात हजर नसतात. पाहणी, मीटिंगच्या नावाने त्यांची भटकंती सुरू असते. पाच दिवसांचा आठवडा असल्याने अनेकजण लागून सुट्या येताच गायब होतात. यामुळे नागरिकांची गैरसोय होते. शिवाय प्रशासकीय कामेही खोळंबतात. हे प्रकार थांबवण्यासाठी प्रशासकांनी थेट आदेशच काढल्याने अनेक अधिकार्‍यांची कोंडी झाली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT