मराठवाडा

औरंगाबाद : आता महिनाभरात लागणार टीईटी परीक्षेचा निकाल

मोहन कारंडे

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) गैरप्रकार केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने राज्यातील 7 हजार 784 परीक्षार्थींची काळी यादी जाहीर केली. नोव्हेंबर 2021 मध्ये घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेचा निकाल लागेल की नाही की परीक्षा रद्द केली जाईल? असा प्रश्न परीक्षा दिलेल्या उमेदवारांना पडला होता. मात्र, आता या परीक्षेचा निकाल लागण्याचा मार्ग मोकळा झाला असून, महिनाभरात निकाल जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी दिली.

शिक्षक पदासाठी टीईटी बंधनकारक असल्याने 2013 पासून राज्यात ही परीक्षा घेतली जाते. कोरोनामुळे 2019 पासून परीक्षेचे नियोजन राज्य परीक्षा परिषदेला करता आलेले नव्हते. कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याने टीईटी परीक्षा 21 नोव्हेंबर रोजी घेण्यात आली, मात्र या परीक्षेचा निकाल जाहीर करण्याआधीच टीईटी घोटाळा उघडकीस आला. त्यात 2019 च्या टीईटी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींच्या प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यांतील गैरप्रकार केलेल्या 7 हजार 874 परीक्षार्थींची नावे राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केली. अपात्र असतानाही गुणांत फेरफार करून अंतिम निकालात पात्र ठरविण्यात आल्याचा ठपका परीक्षार्थींवर ठेवण्यात आला आहे. ही यादी जाहीर केल्यानंतर आता परीक्षा परिषदेकडून नोव्हेंबर 2021 मध्ये घेण्यात आलेल्या टीईटीचा निकाल लावण्यात येणार आहे. ही परीक्षा प्राथमिक (शिक्षक पात्रता परीक्षा पेपर-1) व माध्यमिक स्तरावर (शिक्षक पात्रता परीक्षा पेपर-2) ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत पेपर- 1 साठी 13,199 परीक्षार्थींनी अर्ज भरले होते, त्यांपैकी 11,466 परीक्षार्थींनी परीक्षा दिली, तर पेपर- 2 साठी 9 हजार 705 परीक्षार्थींनी अर्ज भरले होते त्यांपैकी 8,490 परीक्षार्थींनी परीक्षा दिली होती. या परीक्षार्थींची प्रतीक्षा आता संपली असून, लवकरच परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

बारकाईने तपासणी होणारनोव्हेंबर 2021 मध्ये घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. 2019 मध्ये झालेल्या टीईटी घोटाळ्यामुळे परीक्षेच्या उत्तरपत्रिकांची बारकाईने तपासणी करण्यात येणार आहे.
– जयश्री चव्हाण, शिक्षणाधिकारी (प्राथ.)

SCROLL FOR NEXT