उस्मानाबाद; पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देत असलेल्या तुळजाभवानी मातेचे 108 फुटी शिल्प तुळजापुरात उभारण्यात येणार आहे. तिरुपती देवस्थानच्या धर्तीवर इतरही अनेक सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत, अशी माहिती तुळजाभवानी मंदिर ट्रस्टचे सदस्य तथा तुळजापूरचे आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
आ. पाटील म्हणाले, तुळजापूर शहरात 10 एकर जागेत हे भव्य शिल्प उभारले जाईल. या शिल्पाचे डिझाईन स्पर्धेद्वारे निश्चित केले जाईल. यासाठी आपल्यातर्फे 5 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल. हे शिल्प उभारण्यासाठी मंदिर समितीसह शासन, आमदार, खासदार, केंद्र सरकार, सीएसआर फंड आदींच्या माध्यमातून तसेच देणगीदारांना विनंती करून निधी जमा केला जाईल.