उमरखेड कचरा घोटाळा : आमदार ससाने यांच्यासह पाच जणांना अंतरिम जामीन मंजूर 
मराठवाडा

उमरखेड कचरा घोटाळा : आमदार ससाने यांच्यासह पाच जणांना अंतरिम जामीन मंजूर

रणजित गायकवाड

उमरखेड (यवतमाळ); पुढारी वृत्तसेवा : उमरखेड नगरपरिषद तर्फे २०१८  साली स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत झालेल्या कचरा संकलन व  विल्हेवाट प्रकरणातील घोटाळ्यांमध्ये गुन्हा दाखल झालेल्या ११ जणांपैकी तत्कालीन नगराध्यक्ष तथा आमदार नामदेव ससाने यांच्यासह पाच जणांना पुसद येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने १४ फेब्रुवारी रोजी अटकपूर्व अंतरिम जामीन मंजूर केला. या निर्णयाने त्यांना दिलासा मिळाला आहे.

२०१८ या वर्षात  झालेल्या या प्रकरणात अनियमितता व ६५ लाख ७० हजार रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार एमआयएमचे नगरसेवक जलील कुरेशी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. परंतु यावर कारवाई न झाल्याने त्यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे धाव घेतली होती. खंडपीठाने याप्रकरणाची दखल घेतल्याने ३१ जानेवारी रोजी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश पारित करून या प्रकरणात तत्कालीन नगराध्यक्ष तथा आमदार नामदेव ससाने स्थायी समिती सदस्य चंद्रशेखर जयस्वाल, दिलीप सुरते, अमोल तिवरंगकर, सविता पाचकोरे तसेच तत्कालीन मुख्यधिकारी गणेश चव्हाण, आरोग्य निरीक्षक विशाल श्रीवास्तव, मुख्य लेखापाल सुभाष भुते, कंत्राटदार, फिरोज खान (मेकॅनिक) व गजानन मोहाळे व मजूर पुरवठादारपल्लवी कंट्रक्शन नांदेड यांचे विरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते.

यावरून ७ जानेवारी रोजी उमरखेड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. या निर्णयाविरोधात आमदार नामदेव सुतार यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले. तर दुसरीकडे त्यांच्यासह पाच जणांनी पुसद येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. या अर्जावर सोमवारी (दि. १४) सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. कुलकर्णी यांच्यासमोर सुनावणी झाली.

यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. माधवराव माने, अॅड. आदित्य माने यांनी आरोपींच्या वतीने युक्तीवाद करताना नगरपरिषद अधिनियम अंतर्गत कलम ५८(२)चा गैरवापर केल्याच्या ठपक्यावर आक्षेप घेतला. तसेच  जे आरोप नगरविकास मंत्रालयाच्या आदेशात लावण्यात आले आहेत. कसे लागू पडत नाहीत हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्याचबरोबर या प्रकरणात पोलिसांनी अद्यापही आपले म्हणणे मांडण्यात चालढकल केल्याचा मुद्दाही न्यायालयासमोर उपस्थित केला. यावेळी सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील श्रीमती ए. एस. डावखरे यांनी शासनाचे म्हणणे मांडण्यासाठी वेळ मागितला.

दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आमदार नामदेव ससाने, माजी नगराध्यक्ष चंद्रशेखर जयस्वाल, दिलीप सुरते, अमोल तिवरंगकर व सविता पाचकोरे यांना अटकपूर्व जामीन मंजूर करीत पुढील सुनावणीसाठी १७ फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली. दरम्यानच्या काळात सर्व आरोपींनी आपले पासपोर्ट व इतर कागदपत्रे उमरखेड पोलिसांकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT