मराठवाडा

अंबाजोगाई : ‘स्वाराती’त कमरेतील सांधा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

अनुराधा कोरवी

अंबाजोगाई, पुढारी वृत्तसेवा ः अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या अस्थिरोग विभागाने आता आपली कात टाकली आहे. अत्यंत अवघड समजल्या जाणार्‍या शस्त्रक्रिया आता या रुग्णालयात सहज शक्य होऊ लागल्या आहेत. अलीकडेच कंबरेतील सांधा बदलण्याची अवघड शस्त्रक्रिया यशस्विरीत्या पूर्ण करण्यात आली आहे.

अंबाजोगाई स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचा अस्थिरोग विभाग हा गेली काही वर्षांपासून दुर्लक्षित विभाग समजला जात होता. या विभागात पदव्युत्तर शिक्षण नसल्यामुळे पुरेसा स्टाफ या विभागाला मिळत नव्हता व स्टाफ नसल्यामुळे उपचारांसाठी येणार्‍या रुग्णांना तज्ञ डॉक्टरांकडून उपचार ही मिळत नव्हते. अलीकडे या वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता म्हणून डॉ. भास्कर खैरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अनेक विभागांचे अपग्रेडेशन करून घेऊन अनेक विभागांत पदव्युत्तर शिक्षणाच्या संख्या वाढवून दिल्या तर अनेक विभागात पदव्युत्तर शिक्षण सुरू केले.

याच पार्श्वभूमीवर वैद्यकीय महाविद्यालयाच्या अस्थिरोग विभागात पदव्युत्तर शिक्षण सुरू करण्यासाठी केंद्र शासनाच्या एमसीआय (अखिल भारतीय आयुर्विज्ञान आयोग) कडून नव्याने तपासणी करवून घेण्यात आली आणि या विभागाच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी मान्यता मिळाली. एमसीआयच्या तपासणी पार्श्वभूमीवर या विभागात तज्ञ सहयोगी प्राध्यापकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आणि राज्य शासनाकडून या डॉ. दीपक लामतुरे यांच्यासारखा तज्ञ प्रोफेसर ही अधिकृतपणे नियुक्त करण्यात आला. आता या अस्थिरोग विभागाने आपली कात टाकली असून या विभागात सांधा प्रत्यारोपणासारख्या अत्यंत अवघड अशा शस्त्रक्रिया अत्यंत सहजपणे होऊ लागल्या आहेत.

अंबाजोगाई शहरातील मोची गल्ली विभागात राहणारा 60 वर्षीय मेघराज चौधरी हे अशाच प्रकारच्या आजाराने गेली वर्षभर त्रस्त होते. त्यांनी या उपचारासाठी हैदराबाद, पुणे, मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार घेतले, सर्व डॉक्टरांनी यावर अंतिम विलाज हा शस्त्रक्रियाच आहे असे सांगितले व या शस्त्रक्रियेसाठी किमान 5 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असेल असे ही सांगितले.

मेघराज चौधरी यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे म्हणून मग त्यांनी शेवटी स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या अस्थिरोग विभागप्रमुख डॉ. दीपक लामतुरे यांच्या सल्ला घेत याच रुग्णालयात कंबरेतील सांध्याचे प्रत्यारोपणाची अवघड शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवादिनी अस्थिरोग विभागाचे प्रमुख डॉ. दीपक लामतुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक विभाग प्रमुख डॉ. नामदेव जुने, डॉ. गणेश सुरवसे, डॉ. आदित्य, डॉ. सर्वेश आणि अस्थिरोग, भूलशास्त्र विभागातील इतर तज्ञ डॉक्टरांनी आणि परिचारिकांनी या शस्त्रक्रियेत सहभाग नोंदवला.

मेघराज चौधरी यांच्यावर कंबरेतील सांध्याचे प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आल्यानंतर अवघ्या तिसर्‍या दिवशी रुग्णास वॉकरच्या सहाय्याने चालवण्यासही सुरुवात करण्यात आली होती. मेघराज चौधरी यांच्यावरील सर्व उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यास 23 ऑगस्ट रोजी रुग्णालयातुन सुट्टीही देण्यात आली आहे.

स्टेरॉईडच्या अतिवापराचे दुष्परिणाम

मागील वर्षी कोविड काळात सुरुवातीला रुग्णांच्या जीवितासाठी स्टेरॉईड या इंजेक्शनचा अतिवापर झाला आणि आता दोन वर्षांनंतर कोविड झालेल्या अनेक रुग्णांवर या इंजेक्शनचे परिणाम दिसून येऊ लागले आहेत. यात प्रामुख्याने गुडघा आणि कंबरेतील सांधा कमकुवत होऊनचालण्याची गती मंदावणे अथवा चालता न येणे असे प्रकार मोठ्या प्रमाणावर पहावयास मिळून लागले आहेत. रुग्णालयाच्या ओपीडीत अशा प्रकारचे रुग्ण उपचारासाठी येण्याचे प्रमाण वाढले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT