वाशीम; पुढारी वृत्तसेवा : छुप्या मार्गाने सुरु असणाऱ्या तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची साठवणूक, विक्री व वाहतूकीवर स्थानिक गुन्हे शाखा पथकाने धाड टाकली. या कारवाईत आरोपींकडून ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखा, वाशिमच्या पथकाने महाराष्ट्र शासनाकडून प्रतिबंधित असलेल्या वेगवेगळ्या कंपनीचा गुटखा वाशिम पोलीस ठाणे व जऊळका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ८८,३९८/-रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या मिळालेल्या माहितीच्या आधारे जऊळका हद्दीतील काही ठिकाणी धाडी टाकून तीन आरोपींकडून वेगवेगळ्या कंपनीचा गुटखा व पान मसाला असा एकूण अंदाजे किंमत ८४,०८८/-रु मुद्देमाल जप्त केला आहे. त्याचबरोबर वाशिम शहरातील पुसद नाका परिसरातील पानपट्टीमध्ये तपासणी केली असता महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला वेगवेगळ्या कंपनीचा गुटखा जप्त केला आहे. या धाडीमध्ये एका आरोपीकडून वेगवेगळ्या कंपनीचा गुटखा व पान मसाला अंदाजे ४,३१०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अशा एकूण ४ कारवायांमध्ये ४ आरोपींकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला. या आरोपींवर वाशिम व जऊळका पोलीस ठाण्यामध्ये अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या पुढील कायदेशीर कारवाई सुरु आहे. अवैध धंद्यांविरुद्धचे धाडसत्र यापुढे देखील असेच सुरु राहील अशी माहिती पोलिसांनी दिली.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह (IPS) यांचे मार्गदर्शनात पोनि. सोमनाथ जाधव, स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांचे पथक पोउपनि.शब्बीर खा पठाण, पोहवा.किशोर चिंचोळकर, दीपक सोनवणे, पोना.प्रशांत राजगुरू, प्रविण राउत, राजेश राठोड, अमोल इंगोले, पोकॉ. निलेश इंगळे, संतोष शेनकुळे, डीगांबर मोरे, अविनाश वाढे, विठ्ठल सुर्वे, मपोना.संगीता शिंदे, रेश्मा ठाकरे यांनी पार पाडली. सर्व जनतेस सुजाण नागरिक या नात्याने अशा प्रकारची काही तक्रार असल्यास नियंत्रण कक्षास माहिती द्यावीत्या इसमाचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.