मराठवाडा

उमरखेड तालुक्यात २९ शाळा एक शिक्षकी!

मोहन कारंडे

उमरखेड; प्रशांत भागवत : उमरखेड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे. २९ गावातील शाळांमध्ये केवळ एक शिक्षक आहे. तर शिक्षकच नसलेली एक शाळा तालुक्यातील भोजनगर येथे आहे. त्यामुळे तालुक्याला तब्बल १५८ शिक्षकांची गरज आहे. शाळांमध्ये शिक्षकच नसल्याने तालुक्यात शिक्षणाचा बोजवारा उडालेला असून हजारो विद्यार्थ्यांची बोळवण होत आहे.

तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षणाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. तालुक्यात तब्बल १५८ शिक्षकांची कमतरता आहे. दुर्गम पैनगंगा अभयारण्यात वसलेल्या  बंदिभागात येणाऱ्या २५ पेक्षा अधीक गावातील शाळांवर ६० शिक्षकांची आवश्यकता आहे. त्यामुळे तालुक्यात क्षेत्राबाबत विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे.

तालुक्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक अशा १७१ शाळा आहेत. तर ६ शाळा माध्यमिक आहेत. तालुक्यातील या शाळांवर एकुण ८६४ शिक्षकांची गरज असतांना, केवळ ६१२ शिक्षक कार्यरत आहेत. परिणामी कार्यरत शिक्षकांवर कारभार चालविण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.

प्रत्येक शाळांवर एक-दोन शिक्षक कमी करून इतर शाळांवर पाठवून एक प्रकारे तडजोड करून विद्यार्थ्यांना शिक्षण देणे सुरु आहे. याच तडजोडीच्या नादात तब्बल २९ शाळा एक शिक्षकी झाल्या आहेत. याचा फटका बंदी भागातील जेवली, मुरली, एकांबा, मोरचंडी, जवराळा, सोनदाभी, परोटी, गाडी, बोरी, थेरडी, खरबी, दराटी, शिवाजीनगर तांडा, कोरटा, वालतुर, खेडी, सोइंट (घ) भवानी, बोरगाव, डोंगरगाव, चिखली, कुरळी, घमापुर अमडापुर या गावातील शाळांना बसला आहे. ज्या शाळांना शिक्षक नाही व ज्या २९ शाळा एक शिक्षकी आहे. तेथे पहिली ते पाचवी पर्यंतचे वर्ग आहेत. तेथे प्रत्येक शाळेवर केवळ एक शिक्षक असल्याने सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत शाळेत जाऊन शिकवण्याऐवजी त्यांना सांभाळण्याचे काम करावे लागत आहे. या २९ शाळेची पटसंख्या अंदाजे १०० ते १५० विद्यार्थी इतकी जरी धरली तर एकंदरित विद्यार्थ्यांची संख्या हजारोंच्या घरात जाते.

४० टक्के शिक्षकांवर बंदिभागाची शिक्षणव्यवस्था

बंदी भागातील शाळांवर जेवढ्या शिक्षकांची आवश्यकता आहे. त्यापैकी केवळ ४० टक्केच शिक्षक देण्यात आले आहेत. तालुका स्तरापासून या सर्व शाळा ५० ते ६५ किलोमीटर दूर असल्याने शिक्षकही बदलीसाठी तडजोड करतात. एकंदरीत या सर्व प्रकारामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांचे मात्र भवितव्य अंधारमय होण्याच्या दिशेने असल्याची परिस्थिती दिसून येत आहे.

पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना शिकवतो एकच शिक्षक

तालुक्यात तब्बल २९  एक शिक्षकी शाळा असल्याने पहिली ते पाचवीचे विद्यार्थी एकाच वर्गात बसत आहेत. त्यातच एकच शिक्षक पहिलीच्या विद्यार्थ्यांना पाचवीचे शिक्षण, तर पाचवीच्या विद्यार्थ्यांना नाईलाजाने पहिलीचे शिक्षण द्यावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची बौद्धीक क्षमता घसरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT