मराठवाडा

Dr. Jyoti Mete : ‘शिवसंग्राम’चे कार्य अविरतपणे सुरु राहील : डॉ. ज्योती मेटे

नंदू लटके

बीड : उदय नागरगोजे

विनायक मेटे यांच्या निधनाने शिवसंग्राम परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आपण सर्वजण एका विलक्षण अशा दुःखातून जात आहोत; परंतु आपण सर्वजण एकजुटीने यातून सावरण्याचा प्रयत्न करु. आमदार विनायकराव मेटे यांचे विचार डोळ्यासमोर ठेवत शिवसंग्रामचे कार्य अविरतपणे सुरु राहील, असा विश्‍वास ( Dr. Jyoti Mete) डॉ.ज्योती मेटे यांनी व्यक्त केला आहे.

विधान परिषद सदस्यपदी नियुक्तीसाठी राज्यपालांना निवेदन

डॉ.ज्योती मेटे यांनी राजकारणात सक्रीय व्हावे, पक्षाची धुरा त्यांनी सांभाळावी असा ठराव जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत मांडण्यात आला. त्याबरोबरच बीड जिल्ह्याच्या दौर्‍यावर असलेले राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट शिवसंग्रामच्या शिष्टमंडळाने घेतली. यामध्ये डॉ.ज्योती मेटे यांची विधान परिषद सदस्यपदी नियुक्ती करावी, अशा आशयाचे निवेदन शिवसंग्राम व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आले आहे.

Dr. Jyoti Mete : 'ज्‍योती मेटे नवी जबाबदारी समर्थपणे पार पाडतील विश्‍वास'

शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायकराव मेटे हे नाव राज्याच्या कानाकोपर्‍यातील गाव, वाडी, वस्तीवरील प्रत्येकाला माहिती असणारे. मागील पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ ते राजकारण, समाजकारणात सक्रीय होते. मराठा समाजाचे आरक्षण, शिवस्मारक, सारथी या प्रश्‍नांवर त्यांनी राज्यभर जनजागृती केली. समाजहिताचे निर्णय घेण्यास सरकारला भाग पाडले. त्यांच्या या प्रवासाच्या साक्षीदार, साथीदार असलेल्या डॉ.ज्योती मेटे या शासकीय सेवेत असल्याने थेट प्रकाशझोतापासून दूरच राहिल्या; परंतु आता विनायकराव मेटे यांच्या निधनानंतर त्यांच्यावर एक नवी जबाबदारी येऊ पाहतेय. ही जबाबदारी त्या समर्थपणे पार पाडू शकतील, असा विश्‍वास कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांना आहे.

'प्रवाहापासून दूर असलेल्या मराठा समाजबांधवांच्या मार्गदर्शक बनावे'

वाडी, वस्तीपासून सुरु केलेला संघर्षमय प्रवास विनायक मेटेंना राज्याच्या सर्वोच्च सभागृहात घेऊन गेला. पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ त्यांनी राज्याच्या राजकारणावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या पश्‍चात डॉ.ज्योती मेटे यांनी शिवसंग्रामच्या क्रांतीची मशाल हाती घेऊन प्रवाहापासून दूर असलेल्या मराठा समाजबांधवांच्या मार्गदर्शक बनावे, अशी कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांची इच्छा असून त्या हे शिवधनुष्य सहजपणे उचलू शकतात, असा विश्‍वासही आहे.

डॉ.ज्योती मेटे यांचा जन्म नांदेडचा. वडील आनंदराव माणिकराव लाटकर हे सेवानिवृत्त कृषी अधिकारी आहेत तर आई जयश्री लाटकर या गृहिणी. दोन भावांपैकी संजय लाटकर हे आयपीएस अधिकारी तर नितीन लाटकर हे उद्योजक. या कुटूंबाचा राजकारणाशी थेट असा संबंध नसला तरी डॉ.ज्योती मेटे यांचे मावसभाऊ डॉ.माधवराव किन्हाळकर यांनी मंत्रीपद सांभाळलेले. त्यामुळे राजकीय घडामोडी जवळून अनुभवलेल्या. विनायकराव मेटे यांच्याशी विवाहानंतर तर राजकीय क्षेत्राशी त्या कायमच्या जोडल्या गेल्या.

डॉ.ज्योती मेटे यांनी पुढाकार घ्‍यावा : कार्यकर्त्यांची भावना

डॉ.ज्योती मेटे या सध्या नाशिक येथे सहाय्यक निबंधक म्हणून कार्यरत आहेत. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे त्यांनी विधी आणि वैद्यकीय अशा दोन वेगवेगळ्या क्षेत्रातील पदवी प्राप्त केलेली आहे. शासकीय सेवेत असल्याने शिवसंग्रामच्या राजकीय व्यासपीठावर त्या कधी आल्या नाहीत. आता विनायकराव मेटे यांच्या पश्‍चात शिवसंग्रामचे संघटन कायम ठेवणे, समाजाचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा, शिवसंग्रामचा विस्तार यासाठी डॉ.ज्योती मेटे यांनी पुढाकार घ्‍यावा, अशी भावना कार्यकर्त्यांची आहे. याबाबत त्या काय निर्णय घेतात, कोणती भूमिका मांडतात, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे.

इतिहासाची पुनरावृत्ती!

काही दुर्घटना जिल्ह्याच्या, राज्याच्या, देशाच्या समाजकारण, राजकारणावर परिणाम करणार्‍या असतात. अशीच एक दुर्घटना 3 जून2014 च्या पहाटे दिल्लीत घडली होती. केंद्रीय मंत्रीपद सांभाळून काही दिवस होत नाहीत, तोच स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे अपघाती निधन झाले. या घटनेचा जिल्ह्याच्या, राज्याच्या राजकारणावर परिणाम झाला. राजकारणात सक्रीय असलेल्या पंकजा मुंडे यांच्यावर अचानकपणे मोठी जबाबदारी आली. पित्याच्या अंत्यविधीवेळी शोकाकुल अवस्थेतही उपस्थित मुंडेप्रेमींना शांततेचे आवाहन करत त्यांनी नेतृत्व स्वीकारले अन् गत आठ वर्षात ते समर्थपणे सांभाळले. अगदी त्याची पुनरावृत्ती विनायक मेटे यांच्‍या अपघाती निधनाने झाली आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT