मराठवाडा

Shardiya Navratri 2023 : तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र महोत्सव ६ ते ३० ऑक्टोबर कालावधीत होणार

रणजित गायकवाड

तुळजापूर, पुढारी वृत्तसेवा : तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र महोत्सव ६ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. या अनुषंगाने नवरात्राच्या पूर्वतयारीची बैठक देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्या उपस्थितीत पार पडली.
सर्व खातेप्रमुख यावेळी उपस्थित होते. यंदाच्या महोत्सवात दि. ६ आक्टोबर रोजी देवीची मंचकी निद्रा भोपे पुजारी वर्गाकडून दिली जाणार आहे. दि. १५ रोजी पहाटे श्री देवीची सिंहासनावरती प्रतिष्ठापना करून दुपारी १२ वाजता घटस्थापना होईल. दि.१६ ते २२ आक्टोबरदरम्यान रोजी देवीची विशेष अलंकार पुजा असेल. दि.१८ रोजी रथ अलंकार, दि. १९ रोजी मुरली अलंकार, दि. २० रोजी शेषशाही अलंकार, दि. २१ रोजी भवानी तलवार अलंकार, तर दि. २२ ला महिषासुरमर्दिनी अलंकार पुजा होईल.

दररोज देवीचा छबीना धार्मिक विधी पार पडला जाणार आहे. दि. २३ ला दुपारी होमकुंडावरती धार्मिक विधी व घटोउद्यापन केला जाईल. दि. २४ ला पहाटे श्री देवीचे सिम्मोलंघन व मंचकी (श्रम) निद्रा भोपे पुजा-यांकडून दिली जाणार आहे. दि. २८ रोजी कोजागिरी पोर्णिमा असून दि. २९ ला पहाटे देवीची सिंहासनावरती पुन्हा प्रतिष्ठापना करून रात्री छबीना व जोगवा धार्मिक विधी पार पाडला जाणार आहे. दि. २९ व ३० आक्टोबर रोजी सोलापूरच्या मानाच्या काठ्यांचे आगमन व छबीनासह शारदीय नवरात्रची सांगता होणार आहे.

बैठकीत जिल्हाधिकारी यांनी आगामी होवू घातलेल्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या अनुषंगाने करावयाची पुर्व तयारी कामकाजाबाबत नियोजन करणे, भाविकांना सुलभरित्या दर्शनव्यवस्था करून देणे, जास्तीतजास्त सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, कायदा व सुव्यवस्था योग्यरित्या राबविणे आणि सर्व शासकीय निमशासकीय विभाग कामकाज करण्यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना करणे, पुजा-यांच्या व व्यापा-यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.

यावेळी जिल्हापोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, तहसिलदार संतोष पाटील आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकारी श्रीमती वृषाली तेलोरे, भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम, तुळजाभवानी पाळीकर पुजारी मंडळाचे विपीन शिंदे, प्रा. धनंजय लोंढे, संकेत पाटील, उपाध्ये मंडळाचे अध्यक्ष अनंत कोंडो, श्रीराम आपसिंगेकर, सेवेदारी महंत चिलोजीबुवा, महंत तुकोजीबुवा, मंदिर कर्मचारी ए. बी. चव्हाण, आर. एम. भोसले, नगरचे विधीज्ञ विजय भगत, अभिषेक भगत, जितेंद्र भगत, सागर भगत, गणेश पलंगे यांच्यासह अनेक विभागाचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.

पत्रकारांना बैठकीपासून दूर ठेवण्यात आले

तुळजाभवानी देवीचे आध्यात्मिक महत्त्व आणि देशभर प्रसिद्ध करण्यासाठी झटणाऱ्या तुळजापूरच्या पत्रकारांना यंदा बैठकीपासून दूर ठेवण्यात आल्याचा प्रकार घडला. यामुळे पत्रकारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मंदिर संस्थानसाठी अनेक वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या पत्रकारांना डावलण्यात आल्याने संताप व्यक्त होत होता.

SCROLL FOR NEXT