परभणी, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीच्या संकटात पक्षाचे मोठे प्राबल्य असलेल्या परभणी जिल्हयातील नेतेमंडळींसह कार्यकर्तेही सैरभैर झाले आहेत. नेतेमंडळी कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेण्यासाठी भेटीगाठी व बैठकांचे सत्र अवलंबीत आहेत. अशाही स्थितीत प्रमुख अर्ध्या नेत्यांनी साहेबच सबकुछ अशी भूमिका घेत ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. त्याचवेळी आजवरच्या राजकीय वाटचालीत मिळालेल्या पाठबळामुळे नेत्यांची एक फळी संभ्रामवस्थेत आहे. नेहमी भुमिका काय घ्यावी? असाच प्रश्न या पुढार्यांसमोर निर्माण झाला आहे.
दरम्यान जिल्हयाच्या राज्यसभा सदस्या फौजिया खान, जिल्हाध्यक्ष तथा आ.बाबाजानी दुर्राणी, माजी आ.विजय भांबळे, माजी आमदार तथा पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अॅड.विजय गव्हाणे, जिल्हा कार्याध्यक्ष किरण सोनटक्के यांनी सोमवारी (दि.3) पत्रकार परिषदेतून जिल्हयातील सर्व नेतेमंडळी, पदाधिकारी यांनी शरद पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यांच्या सोबत दुसर्या फळीतील अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
जिल्हयात स्थानिक स्वराज्य संस्थांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिलेले आहे. मागील पंधरा वर्षापासुन जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. पाच पंचायत समित्या. पाच कृषी उत्पन्न बाजार समिती व पाच नगर पालिकांवरही राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग या जिल्हयात आहे. त्यामुळेही पवारांचे परभणी प्रेम सर्वश्रुत आहे. अनेक पदाधिकार्यांना सन्मानाची पदे देण्याबरोबर त्यांना मोठे करण्याचे काम ज्येष्ठ नेते पवार यांनी केलेले आहे. त्यांच्या पाठोपाठ अजीत पवारांनीही नव्या फळीतील नेत्यांना पक्षाच्या माध्यमातून पुढे आणण्यासाठी पाठबळ देण्याचे काम गेल्या पंधरा वर्षात केल्याने अजीत पवारांनाही मानणारा वर्गही मोठा आहे. या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादीकाँग्रेसमध्ये निर्माण झालेली फुट या सर्वच नेतेमंडळीसाठी मोठी संभ्रमावस्था निर्माण करणारी आहे. सर्वश्रेष्ठ नेता म्हणून शरद पवारांकडे तर समजून घेवून पाठबळ देणारा नेता म्हणून अजीत पवारांकडे ही मंडळी पाहते. त्यामुळे जावे तरी कोणाकडे अशी द्विधा स्थिती या नेतेमंडळींमध्ये निर्माण झाली आहे.