मराठवाडा

सर्वाधिक प्रदूषित नदी पात्रे महाराष्ट्रातच; पंचगंगा, गोदावरी, मिठी, भीमा, मुठा नद्यांची स्थिती खराब : प्रदूषण नियंत्रण मंडळाचा निष्कर्ष

दिनेश चोरगे

छत्रपती संभाजीनगर; संजय देशपांडे :  'नमामि गंगे' योजनेअंतर्गत केंद्र सरकारने महाराष्ट्राला ११८२ कोटी निधी मंजूर केला असून त्यापैकी २०७ कोटी ४१ लाख रुपये वितरितही केले. मात्र एवढा निधी मिळूनही राज्यातील नद्यांची स्थिती खराबच आहे. राज्यातील ५५ नद्या वनदीपात्रे प्रदूषित असल्याचे समोर आले आहे. या नद्यांतील पाणी पिण्याच्या लायकीचे तर नाहीच; शिवाय जलचर व वनस्पतीसाठीही घातक आहे. पंचगंगा, गोदावरी, मिठी, मुठा, भीमा या नद्यांचा यात समावेश आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (सीपीसीबी) आणि राज्यांतील प्रदूषण नियंत्रण मंडळे नद्यांच्या पाण्याच्या गुणवत्तेची पाहणी करतात. यासाठी देशभरात ४४८४ ठिकाणी यंत्रणा आहे. पाण्यातील बीओडी म्हणजेच बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड (जैवरासायनिक ऑक्सिजन मागणी) या परिमाणावरून गुणवत्ता निश्चित केली जाते. पाण्यात ऑक्सिजनची पातळी योग्य प्रमाणात असली तरच त्यातील जीव जगू शकतात. जेवढा जास्त बीओडी तेवढे अधिक प्रदूषित पाणी असा अर्थ होतो. बीओडीचे मोजमाप मिलिग्रॅम प्रतिलिटर प्रमाणे केले जाते. 'प्रदूषित नदीच्या पाण्याची गुणवत्ता पुनर्संचयित करण्यासाठी कृती आराखडा'नुसार देशात सर्वाधिक प्रदूषित नदीपात्रे महाराष्ट्रात आहेत.

सीपीसीबीने अभ्यास केलेल्या ६०३ पैकी २७९ नद्यांची ३११ पात्रे प्रदूषित आहेत. महाराष्ट्रात ५६ नद्यांच्या १५६ पात्रापैकी ५५ नद्यांची १४७ पात्रे प्रदूषित आढळली. 'बीओडी'नुसार नदीच्या पाण्याचे पाच श्रेणीत वर्गीकरण करण्यात आले आहे. १० पेक्षा जास्त बीओडी असणाऱ्या नद्यांच्या प्रदूषणाचा स्तर अत्यंत वाईट समजला जातो.

राज्यातील कृष्णा, पंचगंगा, गोदावरी, तापी आणि मुळा-मुठा नद्यांच्या स्वच्छतेसाठी ११८२.८६ कोटी रुपयांचा निधी केंद्राने मंजूर करून २०७.४१ कोटीचा निधी राज्याला वितरीतही केला. तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने फेब्रुवारी २०१९ मध्ये राज्यातील सर्वाधिक प्रदूषित २२ नद्यांच्या स्वच्छतेसाठी ६ हजार कोटी रुपयांचा आराखडा तयार केला होता. ११ नद्यांचा तीन हजार कोटींचा प्रस्ताव निती आयोगाला मान्यतेसाठी सादर केला. मात्र तो बारगळल्याचे सूत्रांनी सांगितले.

१७ नद्या वाईट श्रेणीत

भातसा, पेढी, मोर, बुराई, वेल, पानझरा, सिना, काळू, वेण्णा, कोयना, मंजिरा, वेना, पैनगंगा, पेहलार, पूर्णा, उरमोडी, कान या १७ नद्यांचा बीओडी ६ ते १० पर्यंत असून तो वाईट समजला जातो.

२८ नद्या अतिवाईट श्रेणीत

मिठी, मुठा, सावित्री, भीमा, गोदावरी, पंचगंगा, मुळा, पवना, मुळा-मुठा, कान्हा, तापी, गिरणा, कुंडलिका, दारणा, इंद्रायणी, निरा, वैनगंगा, चंद्रभागा, मुछकुंडी, घोड, तितूर, रंगवली, वर्धा, कृष्णा, पाताळगंगा, सूर्या, वाघूर, मोरणा या नद्यांच्या पात्रांचा बीओडी १० ते ३० आढळला असून त्या अतिवाईट श्रेणीत येतात.

वाढते औद्योगिकीकरण व शहरीकरण नद्यांच्या प्रदूषणाचे मुख्य कारण आहे. औद्योगिक, घरगुती सांडपाणी, कचरा नदीपात्रात टाकला जातो. पिकांवरील खतमिश्रीत पाणी, कपडे, जनावरे, वाहने धुतल्याने नद्या प्रदूषित होतात. यास प्रतिबंध घालण्याबरोबरच जागोजागी पाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प सुरू केले तर प्रदूषणावर आळा बसेल.

    – प्रा. डॉ. बलभीम चव्हाण, पर्यावरण तज्ज्ञ.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT