Purna Youth Hunger Strike
पूर्णा : दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलिस कारवाईच्या निषेधार्थ पूर्णा तालुक्यातील सोन्ना येथील सामाजिक कार्यकर्ते गोविंद कदम यांनी शुक्रवार (दि. २४) पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपोषणासंदर्भात त्यांनी यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही सादर केले होते.
उपोषणकर्ते गोविंद कदम यांनी निवेदनात म्हटले आहे की, नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थी दिल्लीतील जंतरमंतर येथे शांततामय आंदोलन करत होते. या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा तसेच काही विद्यार्थ्यांशी गैरवर्तन झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या कथित घटनेचा निषेध म्हणून आपण उपोषण सुरू केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उपोषणकर्त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, तसेच या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, गोविंद कदम यांनी यापूर्वीही शहीद भगतसिंग स्मारक उभारणीच्या मागणीसाठी अनेकवेळा आमरण उपोषण आणि पायी दिंडी आंदोलन केले होते. मात्र, त्या मागणीबाबत प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले. आता दिल्लीतील जंतरमंतर येथील कथित घटनेच्या निषेधार्थ त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू केल्याने पोलिस व महसूल प्रशासनासमोर परिस्थिती हाताळण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.