जिंतूर : आपल्या मित्राबरोबर झाडाखाली गप्पा मारत बसलेल्या १८ वर्षीय तरूणीला गाठून तिच्यावर सामुहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी (दि.१४) दुपारी १२ च्या सुमारास भोगांव देवी संस्थानच्या इटोली शिवारात घडली. इतकेच नव्हे, तर या अमानुष कृत्याची नराधमांनी व्हिडिओ चित्रफीत तयार करून त्याचा गैरवापर करण्याचा प्रयत्न केल्याचीही माहिती समोर आली आहे. घटनेनंतर आरोपी फरार होते, या नराधमांचा तपास करून पोलिसांनी त्यांना अटक केली.
या प्रकरणात पोलिसांनी करण (रा. डोंगरतळा), साबेर (वय २०, रा. भोगांव) आणि शेषराव (वय ३५, रा. भोगांव) या तिघांना अटक केली असून, तर चित्रफीत तयार करणाऱ्या इतर तिघा आरोपींनाही ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींविरुद्ध बलात्कार, धमकी व अश्लील सामग्री तयार केल्याच्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या दुर्दैवी घटनांचा सर्वत्र निषेध होत आहे.
या प्रकरणात पोलिस अधीक्षक रवींद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधीक्षक सुरज गुंजाळ, उपविभागीय पोलिस अधिकारी जीवन बेनिवाल, पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे, स्थायी गुन्हे शाखेचे निरीक्षक पाटील, तसेच सपोनि पुंड यांच्या नेतृत्वाखाली पथक स्थापन करण्यात आले होते. या घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ अधिकारी स्वतः रात्रभर ठाण्यात राहून तपासाचे मार्गदर्शन करत होते. पोलिसांच्या या सततच्या प्रयत्नांमुळे आरोपींना अवघ्या काही तासांत गजाआड करण्यात आले.
घटनेनंतर पोलिस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी स्वतः परिस्थितीचा आढावा घेतला. अप्पर पोलिस अधीक्षक सुरज गुंजाळ आणि उपविभागीय पोलिस अधिकारी जीवन बेनिवाल यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली आणि विशेष पथकाला आरोपींच्या शोधासाठी तत्काळ रवाना केले. या पथकात पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे, स्थागुशा निरीक्षक पाटील, सपोनि पुंड, पोलीस हवालदार गुणगाने, वाघमारे, जिल्हा विशेष शाखेचे पो. ह. जिया खान, माणिक डुकरे, स्थागुशाचे राम पोळ, नामदेव दुबे, मुकेश बुधवंत, पांडुरंग तुपसुंदर, सिद्धेश्वर चाटे, सापोनी कावळे यांचा समावेश होता. या पथकांनी समन्वय साधून आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवले आणि रात्री उशिरापर्यंत नराधमांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.
या घटनेनंतर पोलिसांनी पीडित तरुणीला त्वरित वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली. तिचा जबाब नोंदवण्यात आला. पुरावे गोळा करून संपूर्ण प्रकरण अत्यंत दक्षतेने हाताळण्यात आले. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी जनतेकडून होत आहे. 'आरोपींना न्यायालयीन प्रक्रियेतून कठोर शिक्षा होण्यासाठी सर्व पुरावे सादर केले जातील,' असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.