Parbhani Wasmat Road truck bike collision
ताडकळस : परभणी–वसमत रोडवर भरधाव वेगाने जात असलेल्या आयशर वाहनाने ( एम एच-४४-७५५०) मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. १०) सायंकाळी आसोला पाटी (ता. परभणी) परिसरात घडली. या प्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्यात अज्ञात आयशर वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मैनु इब्राहिम शेख (वय ५५, रा. पेडगाव, ता. जि. परभणी) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांचा मुलगा आरबाज मैनु शेख (वय २५) हा त्याचा मित्र अविनाश तरफडे याच्यासह मोपेडने ( MH-२२ ए सी ९२१५) नांदेड येथून पेडगावकडे परत येत होता. परभणी ते वसमत जाणाऱ्या रोडवर आसोला पाटीच्या पुढे अज्ञात आयशर वाहनचालकाने ओव्हरटेक करताना निष्काळजीपणे डाव्या बाजूने जबर धडक दिली.
या भीषण धडकेत आरबाज मैनु शेख याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मित्र अविनाश तरफडे गंभीर जखमी झाला. अपघातानंतर आयशरचा चालक वाहनासह पसार झाला असून त्याचे नाव व गाव अद्याप निष्पन्न झालेले नाही.
याप्रकरणी ताडकळस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक गजानन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गजानन काठेवाडे पुढील तपास पोउपनि सतिश तावडे करीत आहेत. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही शिंदे यांनी केली आहे. या अपघातामुळे पेडगाव गावात शोककळा पोलिसांकडून फरार आयशर चालकाचा शोध सुरू आहे.