Yeldari Dam | येलदरी धरणात ८८% जलसाठा: शेती, वीजनिर्मिती आणि पाणीपुरवठ्याला संजीवनी Pudhari Photo
परभणी

Yeldari Dam | येलदरी धरणात ८८% जलसाठा : शेती, वीजनिर्मिती आणि पाणीपुरवठ्याला संजीवनी

मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांना जीवदान, बागायतदार सुखावला

पुढारी वृत्तसेवा

पूर्णा : जिंतूर तालुक्यातील पूर्णा नदीवरील येलदरी धरण ८८.१३ टक्के भरले असून, या समाधानकारक जलसाठ्याने परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्याखालोखाल असलेले सिद्धेश्वर धरणही ७६.९० टक्क्यांवर पोहोचल्याने आगामी रब्बी आणि उन्हाळी हंगामातील सिंचनाची चिंता मिटली असून, शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

येलदरी आणि सिद्धेश्वर धरणांच्या पाण्यावर या तीन जिल्ह्यांतील हजारो हेक्टर बागायती शेती अवलंबून आहे. मागील वर्षी (२०२३-२४) दोन्ही धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने शेतकऱ्यांना ऊस, हळद, कापूस आणि भुईमूग यांसारखी पिके यशस्वीपणे घेता आली होती. यंदाही तीच परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी समाधानी आहेत. सध्या शेतात उभ्या असलेल्या पिकांनाही या पाण्याचा मोठा आधार मिळणार आहे.

सध्या धरण ८८ टक्के भरले असले तरी, पुढील पावसाळ्यात ते शंभर टक्के भरेल, अशी खात्री शेतकऱ्यांना आहे. या आशेवरच अनेक शेतकऱ्यांनी आगामी हिवाळी आणि उन्हाळी हंगामासाठी बागायती पिकांच्या लागवडीचे नियोजन आतापासूनच सुरू केले आहे. हा जलसाठा केवळ सिंचनापुरता मर्यादित नसून, येलदरी येथील जलविद्युत निर्मिती केंद्रालाही यातून मोठी चालना मिळणार आहे. याशिवाय, अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागणार असल्याने या धरणांनी संपूर्ण परिसराला मोठा दिलासा दिला आहे. या मुबलक पाणीसाठ्यामुळे आगामी वर्षभर शेती आणि संलग्न गरजांसाठी पाण्याची उपलब्धता निश्चित झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT