पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: विधानसभा निवडणुकीत महायुतीने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करु म्हणून भूलथापा देवून मते घेतली. सत्तेवर येताच शेतक-यांना वा-यावर सोडून दिले. कर्जमुक्ती करण्याचा मुद्दा सोडून दिला. हे सरकार खोटारडे आणि सतत बनवाबनवी करणारे आहे. त्यामुळे कर्जमाफीसाठी वेळ पडली तर रेल्वे स्थानकांवर चक्का जाम आंदोलन करु, असा गर्भित इशारा माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी दिला. पूर्णा येथील राजारामबापू सभागृहात आज (दि.१८) आयोजित घरकूल हक्क परिषदेच्या भव्य मेळाव्यात ते बोलत होते. (Bacchu Kadu)
यावेळी प्रहारचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने, शिवहार सोनटक्के, विष्णू बोकारे, विठ्ठल जोगदंड, मदन भोसले, चंपतराव कदम, सुनील भालेराव, श्रीहरी ईंगोले, संजय वाघमारे आदी उपस्थित होते.
बच्चू कडू म्हणाले की, ज्या दिव्यांग, विधवा शेतकरी, कष्टकऱ्यांना घरकुलचा लाभ मिळाला नाही. अशांची यादी करुन त्यांच्या न्याय हक्कासाठी बीडीओला जाब विचारा. त्यांच्या विरुद्ध संघर्ष करण्यासाठी मी सदैव तयार आहे. योजनेसाठी पैसे मागणाऱ्या अधिकाऱ्यांना धडा शिकवा. बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी हद्दपार करण्यासाठी बीड जिल्ह्याची प्रशासकीय सूत्रे माजी सैनिकांच्या हाती द्या. ते बीडची गुन्हेगारी सुतासारखी सरळ करतील. बीडचा बिहार झाला आहे. तिथे अमानुषपणे मारहाण, खून , दरोडेच्या घटना दररोज घडत आहेत. गुन्हेगारीला पाठीशी घालून सरकारी यंत्रणा आम जनेतेच्या जिवाशी खेळत आहे, असा आरोपही कडू यांनी यावेळी केला.
यावेळी दिव्यांग पुरुष, महिला, विधवा महिला व शेतकरी, कष्टकरी नागरिक उपस्थित होते.