पूर्णा : पुढारी वृत्तसेवा
शहरातील रहिवाशी असलेल्या एका ७१ वर्षीय शेतक-यावर पूर्णा शिवारातील त्यांच्या गट क्रमांक ८४ मधील शेतात रानडुकराने हल्ला चढवला. ऊस पिकाला पाणी देताना काल (ता. ५ एप्रिल) रोजी दुपारी अचानक ऊसातून निघालेल्या रानडुकराने पायाला कडाडून चावा घेत प्राणघातक हल्ला चढवला. यात सदर शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती असी की, पूर्णा शहरातील तात्यासाहेब नगर येथील रहिवासी शेतकरी गणेशराव देविदासराव कदम (जि डी कदम) वय ७१ ते ७२ हे आपल्या पूर्णा शिवारातील गट क्रमांक ८४ मध्य लागवड करण्यात आलेल्या उभ्या ऊसाला पाणी देण्यासाठी दुपारच्या सुमारास शेतात गेले होते. ऊसातील सरीला पाणी लावताना त्यांच्यावर मातलेल्या रानडुक्करांनी अचानक प्राणघातक हल्ला चढवला आणि त्यांच्या पायाला कडाडून चावा घेत गंभीर जखमी केले.
डुकराच्या जबर चाव्यामुळे त्यांच्या पायाचे हाड मोडून फॅक्चर झाले. दरम्यान, शेतकरी जि डी कदम हे डुकराचा हल्ला झाल्यामुळे जखमी होवून एकदम घाबरून गेले. घटनास्थळी शेजारील शेतकरी व नातेवाईक धावून आले. त्यांनी तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करुन उपचार केले. मागील अनेक दिवसांपासून पूर्णा शिवारात मातून गेलेल्या रानडुक्करांनी हौदोस घातला असून रात्री बरोबरच दिवसाढवळ्या देखील कळपाच्या जमावाने वावरुन बागायती पिकांची मोठ्या प्रमाणावर नासधूस करत आहेत. त्याच बरोबर काही वेळा शेतीकाम करताना शेतकऱ्यांवर जिवघेणे हल्ले करु लागलेत. रानडूकरांचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाचे वनाधिकारी कोणत्याही उपाययोजना न राबवता सुस्तावल्याचे दिसून येत आहेत. हिंस्र वन्य प्राण्यांचा बंदोबस्त होत नसल्याने ग्रामस्थांमधून वनविभागाबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.