पावसामुळे भाजीपाला विक्रेते आणि शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली (Pudhari Photo)
परभणी

Unseasonal Rain Purna | पूर्णा तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा; शेतकरी, भाजीपाला विक्रेत्यांची तारांबळ

पूर्णा तालुका परिसरात मंगळवारी (दि. २८) सायंकाळी साडेसहा ते सात या वेळेत जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली.

पुढारी वृत्तसेवा

Unseasonal Rain Purna taluka Farmers Affected

पूर्णा : पूर्णा तालुका परिसरात मंगळवारी (दि. २८) सायंकाळी साडेसहा ते सात या वेळेत जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक कोसळलेल्या पावसामुळे भाजीपाला विक्रेते आणि शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली.

आधीच अतिवृष्टीमुळे मोठ्या नुकसानीचा सामना केलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा पावसाने झोडपले आहे. ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीप हंगाम जवळपास वाया गेला होता. अशा परिस्थितीत शेतकरी रब्बी हंगामासाठी तयारी करत असतानाच पुन्हा अवकाळी पाऊस सुरू झाल्याने त्यांच्या चिंता अधिक वाढल्या आहेत.

काही सखल भागात अजूनही जमीन ओलसर आहे, तर काही ठिकाणी वाफसा होण्याच्या स्थितीत आहे. परंतु या पावसामुळे पेरणीची कामे पुन्हा थांबण्याची शक्यता आहे. अनेक शेतकऱ्यांना अद्याप अतिवृष्टीच्या नुकसानीबाबत शासनाकडून अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे दिवाळी काळातही अनेक शेतकऱ्यांच्या घरात अंधारच राहिला.

काही ठिकाणी अतिवृष्टीत वाचवलेले सोयाबीन शेतकऱ्यांनी कापणी करून सुड्या रचल्या असल्या तरी या पावसामुळे मळणीचे काम अडचणीत आले आहे. शासनाने दिवाळीपूर्वी अनुदान देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र ते अद्याप पूर्ण झालेले नाही. परिणामी, काही भागांमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी सरकारविरोधात निषेध केला आहे. अस्मानी आणि सुलतानी संकटांचा दुहेरी फटका बसलेल्या शेतकऱ्यांवर पुन्हा अवकाळी पावसाचे संकट कोसळल्याने ते चिंताग्रस्त झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT