Two RTO clerks caught in ACB's net while accepting bribe of Rs 1,300 to register two-wheeler
परभणी, पुढारी वृत्तसेवा उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालय, आसोला येथे दुचाकी वाहन नावावर करण्याच्या प्रक्रियेत लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (दि.३) धडक कारवाई करत दोन लिपिकांना रंगेहात पकडले.
कनिष्ठ लिपिक तथा टंकलेखक मीरा नारायणराव लोकरे आणि लिपिक तथा टंकलेखक सय्यद जफर सय्यद अकबर यांनी तक्रारदाराकडून अनुक्रमे ८०० रुपये व ५०० रुपये, अशी एकूण १,३०० रुपयांची लाच स्वीकारल्याचे सापळा कारवाईत निष्पन्न झाले.
या कारवाईमुळे आरटीओ कार्यालयासह जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे शहरातील धार रोड परिसरातील एका २८ वर्षीय युवकाने तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराने नोव्हेंबर २०२५ मध्ये मोटारसायकल खरेदी केली होती.
वाहन स्वतःच्या नावावर हस्तांतरित करण्यासाठी आवश्यक ऑनलाइन शुल्क भरल्यानंतर ३० जून रोजी तो उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, आसोला येथे गेला होता. मात्र, संबंधित फाईलची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी कनिष्ठ लिपिक मीरा लोकरे यांनी १,००० रुपयांची लाच मागितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला. तक्रारीची दखल घेत एसीबीने १ जुलै रोजी पंचांसमक्ष पडताळणी केली.
या पडताळणीत मीरा लोकरे यांनी सुरुवातीला १,००० रुपयांची मागणी करून नंतर तडजोडीनंतर ८०० रुपयांवर सौदा निश्चित केल्याचे स्पष्ट झाले. तसेच दुसरे लिपिक सय्यद जफर यांनी मोटारसायकलची संगणकीय पडताळणी करून दंड प्रलंबित नसल्याची खात्री देणे, कागदपत्रांवर 'नो वाँटेड' असा शिक्का मारणे आणि आवश्यक सही करण्यासाठी ५०० रुपयांची लाच मागितल्याचे पंचांसमक्ष निष्पन्न झाले.
पडताळणीत लाचेची मागणी स्पष्ट झाल्यानंतर एसीबीने ३ जुलै रोजी नियोजनबद्ध सापळा रचला. तक्रारदाराने पंचांसमक्ष मीरा लोकरे यांना ८०० रुपये, तर सय्यद जफर यांना ५०० रुपये दिले. दोघांनीही ही रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने तत्काळ कारवाई करत दोघांना रंगेहात ताब्यात घेतले. सापळा कारवाईनंतर आरोपींच्या मोबाईल फोनची तपासणी करण्यात आली असून, आवश्यकतेनुसार ते जप्त करण्याची तयारी ठेवण्यात आली.
तसेच आरोपींच्या निवासस्थानी घरझडतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. या प्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, गुन्हा नोंद झाल्यानंतर दोन्ही आरोपींना अटक करण्यात येणार असल्याची माहिती एसीबीकडून देण्यात आली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक अल्ताफ मुलाणी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक महेश पाटणकर यांनी कारवाईचे पर्यवेक्षण केले असून, पुढील तपासही त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.