पूर्णा, पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील चुडावा येथील शेतकरी गणेशराव साहेबराव देसाई यांच्या न-हापूर शिवारातील गट क्रमांक ३२ मधील तोडणी रिक्व्हरीला आलेला अडिच एकर ऊभ्या ऊसाला लोंबकाळणाऱ्या विद्यूत वहन तारेचा स्पर्श झाला. यामध्ये ता. ३१ जानेवारी रोजी दुपारी तारेचे घर्षण होत ठिणग्या पडल्या. यामध्ये ऊस जळून खाक झाला. त्याच बरोबर ऊस फडालगत बांधावरील फळबागेच्या झाडांनाही याची धग लागली यामध्ये फळझाडेही होरपळली गेली.
याच शेतकऱ्याचा शॉटसर्किटने मागील महिन्यात देखील ३१ डिसेंबर रोजी सकाळी अडिच एकर ऊस जळाला होता. त्यानंतर महावितरण पूर्णा उपविभाग कार्यालयातील ग्रामीण अभियंता वसमतकर यांना विद्यूत खांबावर लोंबकळलेले विजेच्या तारा ठिक करण्याची विनंती केली होती. परंतू सदर अभियंता व लाईनमेनने तारा ठिक न केल्यामुळे परत एकदा ऊस जळून शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
ग्रामिण भागातील अन्य गावातील शेतशिवारात देखील विजेच्या तारा ठिकठिकाणी लोंबकळलेल्या अवस्थेत असून उभे ऊस पीक जळून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. तरी देखील महावितरणचे अभियंता गांभीर्य घेत नसल्याची ओरड शेतकऱ्यातून केली जात आहे.