परभणी, पुढारी वृत्तसेवा
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या लातूर येथील तेलबिया संशोधन केंद्राने विकसीत केलेल्या टीएलटी 10 या तिळाच्या वाणाला केंद्र सरकारकडून क्षेत्र वाढीस देशपातळीवर अधिकृत मान्यता मिळाली आहे. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वाण अधिसूचना व प्रसारण समितीच्या बैठकीत या वाणास मान्यता मिळाली आहे.
टीएलटी 10 वाणास खरीप तसेच रब्बी व उन्हाळी हंगामात लागवडीसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, गुजरात, आंध्रप्रदेशातील तेलंगणा भाग या राज्यांतही खरीप हंगामात लागवडीसाठी मान्यता देण्यात आली आहे. या वाणाला 8 ऑक्टोंबर 2024 रोजी अधिसूचीत करण्यात आले होते. वनामकृविचे कुलगूरू डॉ.इंद्र मणी, संचालक संशोधन डॉ.खीजर बेग, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ.हिराकांत काळपांडे यांच्यासह अन्य शास्त्रज्ञांचे या संशोधनामागे योगदान राहिले आहे. या वाणाच्या विकासामध्ये प्रभारी अधिकारी डॉ.मोहन धुप्पे, कनिष्ठ पैदासकार डॉ.शिवशंकर पोले आणि तेलबिया संशोधन केंद्रातील वैज्ञानिक तथा तांत्रिक कर्मचार्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे.
या संदर्भात कुलगुरू डॉ.इंद्र मणी यांनी शास्त्रज्ञांचे अभिनंदन करीत टीएलटी 10 वाणामुळे शेतकर्यांना अधिक उत्पादनक्षम आणि गुणवत्तापूर्ण तीळ उत्पादनाची संधी मिळणार असून देशातील तीळ उत्पादनात आणि शेतकर्यांच्या उत्पन्नात लक्षणिय वाढ होईल, असे मत व्यक्त करीत वाणाच्या संशोधनामधील शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.
वनामकृविचे संशोधन संचालक डॉ.खिजर बेग यांनी या नव्या वाणाचा प्रसार प्रभावीपणे करण्याचा कृषी विद्यापीठाचा संकल्प असून या वाणाचे बियाणे लवकरच देशभरात विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती दिली.
तिळाचा टीएलटी.10 हा वाण 90 ते 95 दिवसांमध्ये परिपक्व होतो. 7 ते 8 क्विंटल प्रतिहेक्टर इतके उत्पादन देतो. या वाणामध्ये तेलाचे प्रमाण 45.2 टक्के इतके आहे. मॅक्रोफोमिना, मुळ व खोडकुज, फायलोडी या सारख्या रोगांवर तसेच पाने गुंडाळणारी व बोंड पोखरणारी अळी यासारख्यां किटकांवरही या वाणाची सहनशिलता आहे.