परभणी : शासनमान्य नर्सिंग स्कूलमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांकडून लाच मागणार्या तिरुपती नर्सिंग स्कूलच्या अध्यक्षास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (दि.15) रंगेहाथ पकडले. अध्यक्ष संभाजी मुंजाजी टोम्पे (वय 73) यांनी इतर खर्चाच्या नावाखाली 20 हजारांच्या लाचेची मागणी केली होती. त्यांच्यासोबत लाच स्वीकारणार्या शेख माजेद शेख युनूस (वय 28) इसमालाही ताब्यात घेण्यात आले.
तक्रारदार हा अनुसूचित जातीतील असून त्यास जी.एन.एम.कोर्ससाठी शासनाच्या नियमानुसार कोणतीही फी लागणार नव्हती. मात्र तिरुपती नर्सिंग स्कूलचे अध्यक्ष टोम्पे यांनी प्रवेश प्रक्रियेच्या नावाखाली 20 हजार रूपये इतर खर्चासाठी देण्यास सांगितले. तक्रारदाराने ही माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिल्यानंतर विभागाने पडताळणी केली. दि.14 जुलै रोजी पंचासमक्ष झालेल्या पडताळणी दरम्यान आरोपी टोम्पे यांनी प्रत्यक्ष लाचेची मागणी केल्याचे सिध्द झाले. त्यांनी विद्यार्थ्याला विविध प्रशिक्षण, बेड व्यवस्थापन, चालू खर्च आदी कारणे सांगून रक्कम भरण्याचा आग्रह धरला.
मंगळवारी (दि.15) लाचलुचपत प्रतिबंधक विभाग युनिटने नियोजनपूर्वक सापळा रचून ही कारवाई केली. अध्यक्ष टोम्पे यांनी रक्कम थेट न स्वीकारता ती शेख माजेद शेख युनूस या खाजगी व्यक्तीकडे देण्यास सांगितले. तक्रारदाराने 20 हजारांची रक्कम शेख माजेद याला दिल्यानंतर माजेदने ती अध्यक्ष टोम्पे यांच्याकडे सुपूर्त केली. ही संपूर्ण प्रक्रिया पंचासमक्ष झाली असून लाच स्वीकारल्याचे पुरावे विभागाकडे आहेत. टोम्पे यांच्या अंगझडतीत लाच म्हणून स्वीकारलेली रोकड, तसेच काही महत्त्वाचे कागदपत्र व मोबाइल जप्त करण्यात आले.
शेख माजेदच्या झडीतीतही संशयित रक्कम व इतर वस्तू सापडल्या. दोघांच्याही घरी झडती घेतली जात आहे. आरोपींविरुध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई एसीबीचे पोलिस उपअधिक्षक महेश पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकात निरीक्षक अल्ताफ मुलाणी, सपोउपनि निलपत्रेवार, पोशि अतुल कदम, पोह आदमे, मपोह सीमा चाटे यांचा समावेश होता. कारवाईस नांदेडचे पोलिस अधिक्षक संदीप पालवे, अपर पोलिस अधिक्षक डॉ. संजय तुंगार यांचे मार्गदर्शन लाभले.