Thuna River Flood Bridge Construction Delay
पूर्णा : तालुक्यातील पूर्णा-झिरोफाटा रस्त्यावर माटेगावजवळील थुना नदीला आलेल्या जोरदार पुरामुळे परिसरातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. पुलाचे बांधकाम अद्याप अपूर्ण असल्याने पर्यायी रस्ताही पुराच्या पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी येणारी वाहने थांबवण्यात आली असून, प्रवाशांसह स्थानिक शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे थुना नदीला मोठा पूर आला आहे. नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने परिसरातील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. शेतकऱ्यांना देखील शेतात जाऊन जनावरांसाठी चारा पाणी आणता येत नाही. दरवर्षी पावसाळ्यात येथे अशीच परिस्थिती निर्माण होते.
माटेगावजवळील नदीवर मागील दोन वर्षांपासून पुलाचे काम सुरू आहे. हे काम बीड-अंबाजोगाई येथील गुत्तेदार गोविंद बिक्कड यांच्या मार्फत सुरू असून, अत्यंत संथगतीने चालू आहे. मुदत संपूनही पुलाचे काम पूर्ण झालेले नाही. यंदाच्या पावसाळ्यापूर्वी पुलाचे बांधकाम पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती; मात्र गुत्तेदाराने काम पूर्ण केलेले नाही.
रस्ता बंद झाल्याने प्रवासी आणि शेतकरी हैराण झाले आहेत. वाहतूक ठप्प झाल्याने दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला आहे. दरम्यान, उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर यांनी नागरिकांना पुराच्या पाण्यातून वाहतूक करू नये, असा सतर्कतेचा इशारा दिला आहे.