The wild fruit 'Mohal' found in the fields is on the verge of extinction.
पेठपिंपळगाव, पुढारी वृत्तसेवा : ग्रामीण भागात हिवाळ्याच्या दिवसांत सहज उपलब्ध होणारे, रानमेवा व गुणकारी औषध म्हणून ओळखले जाणारे मोहळ आता शेतासह झुडपांत दुर्मिळ होत आहे. एकेकाळी शेतशिवारात मोठ्या प्रमाणात आढळणारा हा मोहळ सध्या दिसेनासा झाल्याने निसर्गप्रेमी, शेतकरी तसेच गरीब मजूरांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले.
मोहळ हे असे एक औषधी अन्न आहे की, त्यासाठी शेतकऱ्यांना कोणतीही पेरणी करावी लागत नाही. निसर्गाच्या सान्निध्यात मोफत मिळणारे हे गुणकारी औषध आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
मोहळ हा मधमाशांनी तयार केलेला एक नैसर्गिक गुलकंद असून तो लहान मुलांसाठी विशेषतः उपयोगी मानला जातो. ग्रामीण भागात याचा वापर औषध म्हणून केला जात असे. मात्र अलीकडील काळात रब्बी हंगामातील फुलोऱ्याची पिके मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने मधमाशांना आवश्यक अन्न मिळत नाही.
परिणामी मधमाशांचे थवे कमी होत असून मोहळ तयार होण्याचे प्रमाणही घटले. पूर्वी शेताच्या कडेला, झुडपांत, लिंबाच्या झाडांवर मोठ्या प्रमाणात मोहळ आढळत असे. मात्र बदलत्या शेती पध्दती, कीटकनाशकांचा वाढता वापर व फुलझाडांची घट याचा थेट परिणाम मोहळाच्या अस्तित्वावर झाला. ग्रामीण भागातील गरीब मजूरांतील अनेक मुलांसाठी मोहळ हे हिवाळ्यातील उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन होते.
सकाळी लवकर शेतात जाऊन मोहळ शोधणे, ते गोळा करून शहरी बाजारात विकणे असा त्यांचा दिनक्रम असे. मोहळाची किंमत त्याच्या आकारावर अवलंबून असे. विशेषतः लिंबाच्या झाडावरील मोहळ हा लहान मुलांसाठी गुणकारी औषध म्हणून ओळखला जात असल्याने त्याची मागणी अधिक होती. सध्या मोहळाचे प्रमाण कमी झाल्याने या मुलांचे उत्पन्नाचे साधनही बंद पडत चालले आहे. मोहळासारख्या नैसर्गिक संपत्तीचे संवर्धन होण्यासाठी पर्यावरणपूरक शेती, फुलझाडांची लागवड व मधमाशी संवर्धनाची गरज तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.