The cocktail game of counterfeit liquor mafia
ज्ञानेश्वर ठाकरे
महागाव : महागाव तालुक्यातील फुलसावंगी आणि परिसरातील परवानाधारक वाईन बारच्या आडून बनावट दारू विक्रीचा सुळसुळाट सुरू झाला आहे. परवाना शासनाचा आणि धंदा माफियांचा, असा प्रकार सध्या राजरोसपणे सुरू असून मद्यप्रेमींच्या जीवाशी खेळ सुरू आहे.
विशेष म्हणजे, या गंभीर प्रकाराबाबत विचारणा केली असता उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत असून त्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. फुलसावंगीसह काळी दौलत आणि महागाव शहरात सुरू असलेला हा 'कॉकटेल' खेळ एखाद्या मोठ्या दुर्घटनेला आमंत्रण देणारा ठरत आहे.
फुलसावंगी येथील एका सरकारमान्य वाईन बारमधून बनावट दारू विकली जात असल्याची विश्वसनीय माहिती समोर आली आहे. यासंदर्भात 'दैनिक पुढारी'च्या प्रतिनिधीने पुसद येथील उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी श्री. वाघ यांच्याशी संपर्क साधून प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी फोनवर बोलणे टाळत, जे काही बोलायचे आहे ते एसएमएसद्वारे कळवा, असा निरोप दिला. प्रतिनिधीने तात्काळ एसएमएसद्वारे विषयाची माहिती दिली, मात्र त्यानंतरही अधिकाऱ्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. अशा अवैध धंद्यांना खतपाणी घालणाऱ्या अधिकाऱ्यांच्या या मौनामुळे माफियांचे मनोबल वाढले आहे.
खोटे लेबल, निकृष्ट दर्जा
स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नामांकित ब्रेडच्या बाटल्यांमध्ये निकृष्ट दर्जाची दारू भरून आणि त्यावर खोटे लेबल लावून विक्री केली जात आहे. या दारूचा उगम, निर्मिती ठिकाण किंवा गुणवत्ता तपासणी याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. तरीही परवानाधारक दुकानांतून ही 'विषारी' दारू ग्राहकांच्या माथी मारली जात आहे. हा प्रकार केवळ फुलसावंगीपुरता मर्यादित नसून काळी दौलत आणि महागाव शहरातील काही बारमध्येही असाच प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी मद्यप्रेमींकडून येत आहेत.