पूर्णा, पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील झिरोफाटा ते वसमत या मुख्य रस्त्यावरील आरळ गावानजीक ता.१५ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान ऊसाचा ट्रॅक्टर आणि कार या दोन्ही वाहनांची जोरदार धडक होऊन भिषण अपघात झाला. या अपघातात कारचा चक्काचूर होवून कारमधील चालक युवक (रा.पूर्णा शहरातील एकबाल नगर) यांच्या डोक्याला जबर मार लागून तो गंभीर जखमी झाला होता. दरम्यान, त्यास तेथील उपस्थित व्यक्ती तथा नातेवाईकांनी तात्काळ परभणी येथील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या बाबत अधिक माहिती अशी की, पूर्णा शहरातील एकबालगर येथील रहिवासी असलेला युवक सय्यद खाजा सय्यद अल्ली (वय अंदाजे २८ वर्ष) हा ता. १५ फेब्रुवारी रोजी झिरोफाटा ते वसमत या मुख्य रस्त्यावरुन आपल्या एम एच १४ एफ सी २२७५ या स्विफ्ट डिझायर कारने प्रवास करीत होता. त्याच्या कारचा आणि एका ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा आरळ गावानजीक वळण रस्त्यावर भिषण धडक झाली. या अपघातात कारचा चक्काचूर होवून आतमधील चालक युवक सय्यद खाजा सय्यद अल्ली वय अंदाजे २८ वर्ष यांच्या शरिरास व डोक्याला जबरदस्त मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला.
त्यास उपचारार्थ परभणी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले असता तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले. दरम्यान, सदर अपघात घटनेची माहिती हट्टा व पूर्णा पोलिस ठाण्यात कळवण्यात आली असून पुढील तपास हट्टा पोलिस करत आहेत. अचानक झालेल्या या अपघातात सय्यद खाजा सय्यद अल्ली यांच्या अपघाती मृत्यूमुळे पूर्णा शहरावर एकच शोककळा पसरली असून सदर युवक पूर्णा शहरातील सामाजिक कार्यकर्ते सय्यद अल्ली सय्यद हसन यांचा तो मुलगा होता.