गंगाखेड (जि. परभणी) : गंगाखेड-परळी मार्गावरील पडेगाव पाटीजवळ सोमवारी (१५ डिसेंबर) सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास नागपूर आगारच्या (गणेशपेठ) एस.टी. बस आणि ट्रॅक्टरमध्ये समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रॅक्टरवरील ६० वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून, बसमधील वाहक, चालक यांच्यासह नऊ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
नागपूरहून आंबेजोगाईकडे जाणारी (एम. एच. ०९ एफ एल ०१७९) क्रमांकाची बस पडेगाव पाटीजवळून जात असताना, समोरून येणाऱ्या एका ट्रॅक्टरला धडकली. धडकेमुळे ट्रॅक्टरची ट्रॉली परळी रोडवरील उजव्या बाजूला, तर बस रस्त्याच्या डाव्या बाजूला पलटी झाली. हा अपघात इतका भीषण होता की, यात ट्रॅक्टर वर असणारे परमेश्वर डावरे (वय ६०) राहणार गंगाखेड यांचा अपघाता दरम्यान जागीच मृत्यू झाला आहे .
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेतली. गंगाखेड येथील रुग्णवाहिका चालक रावण भालेराव, परमेश्वर भालेराव, रामेश्वर भालेराव, हनुमान इंगळे, विष्णू होरे आणि राज्य शासनाच्या रुग्णवाहिका सेवेचे डॉ. बबन चाटे यांनी घटनास्थळी जाऊन जखमींना गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी मोलाची मदत केली.
उपजिल्हा रुग्णालयात डॉ. चट्टे, डॉ. काकडे, डॉ. योगेश मल्लेरवार, डॉ. चांदकर तसेच परिचारिका प्रज्ञा जोगदंड, शितल पांचाळ, प्रमिला पुट्टेवाड, वैशाली केंद्रे आणि कर्मचारी प्रशांत राठोड, भीमा राठोड, भारत पदरगे, रशीदशहा, दत्ता साबणे यांनी तातडीने जखमींवर उपचार सुरू केले.
अपघातामुळे रस्त्यावर काचेचे तुकडे आणि पलटी झालेली वाहने असल्याने उपविभागीय अधिकारी डॉ. समाधान पाटील आणि पोलिस निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी तातडीने परिस्थितीची पाहणी करत रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक प्रयत्न केले.